घाटकोपरच्या हिंदुस्थान कंपोजिट्स लिमिटेडमधील 1100 कामगारांना शिवसेनेने न्याय मिळवून दिला आहे. 30 वर्षांच्या लढय़ानंतर कामगारांना थकीत महागाई भत्ता (डीए) मिळाला असून या महागाई भत्त्याच्या धनादेशाचे वितरण आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’ निवासस्थानी करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरूपात 10 कामगारांना धनादेश देण्यात आले. त्यानंतर उर्वरित कामगारांना सायंकाळी घाटकोपर पश्चिम येथील एसएनडीटी कन्या महाविद्यालयाच्या सभागृहात धनादेश वाटप करण्यात आले. हजारो कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. उतारवयात मिळालेले हक्काचे हे पैसे आमच्यासाठी मोलाचे आहेत, अशी भावना व्यक्त करताना कामगारांच्या डोळय़ात आनंदाश्रू तरळले.
कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले ही आनंदाची बाब आहे. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे सारेच कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी गेली 30 वर्षे लढा देणाऱ्या सर्वांचेच काwतुक केले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, आमदार सुनील राऊत, माजी महापौर महादेव देवळे, विभागप्रमुख सुरेश पाटील, माजी नगरसेवक संजय भालेराव, विधानसभा समन्वयक रवींद्र कोठावदे, माजी उपविभागप्रमुख नंदू आंबोकर, उपविभागप्रमुख विजय पडवळ तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कामगार संघटनांचे नेते उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी उर्वरित कामगारांना घाटकोपरच्या एसएनडीटी कन्या महाविद्यालयाच्या सभागृहात धनादेश वाटप करण्यात आले. या सोहळय़ाला कामगार आणि त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीने हॉल हाऊसफुल्ल झाला होता.
सेवा कालावधीनुसार डीएची रक्कम
हिंदुस्थान कंपोजिट्स लिमिटेडमधील कामगारांचा थकीत डीएचा लढा 30 वर्षे औद्योगिक न्यायालय, उच्च न्यायालयात चालूनही यावर काही निर्णय होईना. शेवटी संतप्त कामगारांनी हा लढा कोर्टाबाहेर सोडवावा अशी भूमिका विक्रोळीच्या बैठकीत घेतली. कामगारांना थकीत डीए मिळावा यासाठी माजी उपविभागप्रमुख नंदू आंबोकर यांच्यासह सुधीर पाटील, अप्पा चव्हाण, एल. जी. नाईक यांनी प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना लोहमार्ग आयुक्त रवींद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ यांची साथ लाभली. त्यानंतर आंबोकर यांच्यासह सर्व प्रयत्नकारांनी हिंदुस्थान कंपोजिट्सच्या मालकांशी चर्चा केली. त्यावेळी मालकही कोर्टाबाहेर यावर तोडगा काढण्यात तयार झाले. त्यानुसार प्रत्येक कामगाराला आणि मृत कामगारांच्या वारसाला डीएची रक्कम त्यांनी केलेल्या सेवा वर्षानुसार मिळणार आहे.