
मराठी नाटककार अभिनेते सतिश आळेकर यांची ओळख मराठी माणसाला तर आहेच. परंतु कलेच्या प्रांतातही सतिश आळेकरांची कारकीर्दही तितकीच वाखाणण्याजोगी आहे. आळेकरांनी रंगभूमीप्रमाणेच ‘जैत रे जैत’ चित्रपटाची पटकथा, ‘देखो मगर प्यार से’ ही दूरदर्शन मालिका, ‘कथा दोन गणपतरावांची’ या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत.
नुकतेच सतिश आळेकर अमोल परचुरे यांच्या ‘कॅचअप’ या पॉडकास्टमध्ये आले असता, विविध विषयांवर त्यांनी यावेळी गप्पा मारल्या.
अमोल परचुरे यांच्याशी संवाद साधताना आळेकर म्हणाले, ‘काँग्रेसमध्ये सुद्धा डावे असायचे उजवे असायचे. भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा डावे उजवे असायचे. आमचे सर्व शिक्षक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. आमच्यावर सर्व संस्कार संघाच्या शिक्षकांनी केले. पण आम्ही कधी संघाचे झालेलो नाही आणि त्याच्याबद्दल कुणी काही म्हटलं पण नाही’.
‘पूर्वीच्या काळी अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन असायचे. ते पुण्याला आले की आमच्या नाटकाला यायचे. अनेक वेळा मी त्यांना सिट दिलेली आहे. पण 2014 नंतर मात्र सर्व बदललं. याचा काहीतरी वेध घ्यायला हवा. 2014 नंतर सर्वसमावेशक गोष्टींचा परीघ हळूहळू कमी व्हायला लागला. माझं मत आहे तेच खरं आणि तू जर माझ्या मताचा नसशील तर शत्रू. हे मला असं वाटतं की बरोबर नाही.’
देशातील तसेच राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना, सतिश आळेकर यांनी या पाॅडकास्टमध्ये विविध विषयांना हात घातला. देशामध्ये २०१४ नंतर परिस्थिती कशी बदलत गेली हे त्यांनी अतिशय समर्पक भाषेत उलगडून सांगितलं. नाट्यक्षेत्रातील सतिश आळेकरांचे योगदान हे बहुमूल्य असल्याने, त्यांनी नाट्यक्षेत्रातील काळाप्रमाणे झालेल्या विविध घडामोडींवरही यावेळी गप्पा मारल्या.