LA Olympics 2028 – 128 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये पडणार चौकार अन् षटकारांचा पाऊस, 6 संघांचे 90 खेळाडू करणार धमाका

ऑलिम्पिक स्पर्धेचे दिमाखदार आयोजन 2028 साली लॉस एंजेलिसमध्ये होणार आहे. ही ऑलिम्पिक स्पर्धा ऐतिहासिक ठरणार आहे कारण स्पर्धेत 128 वर्षांनी क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. यापूर्वी 1900 साली झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर एकदाही क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्यात आलेले नाही.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) यासदंर्भात अधिकृत घोषणा केली असून 128 वर्षांनी क्रिकेट खेळाचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागम होणार असल्याचे निश्चित झाले आहे. आयओसीने दिलेल्या माहितीनुसार, ऑलिम्पिकमध्ये पुरुषांचे सहा आणि महिलांचे सहा संघ सहभागी होणार आहे. त्याचबरोबर कोणकोणते संघ ऑलिम्पिकमध्ये खेळणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. तसेच त्याची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार हे सुद्धा अद्याप ठरवण्यात आलेले नाही. क्रिकेट खेळाव्यतिरिक्त ऑलिम्पिक स्पर्धेत स्क्वैश, फ्लॅग फुटबॉल, बेसबॉल/सॉफ्टबॉल आणि लैक्रोस या खेळांचा सुद्धा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे.

क्रिकेट खेळाचा समावेश 1900 साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा करण्यात आला होता. त्यावेळी ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स या दोन संघानी ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. उभय संघांमध्ये एकमेव सामना खेळला गेला होता. या स्पर्धेत इंग्लंडने सुवर्णपदक आणि फ्रान्सने रौप्यपदक पटकावले होते.