जगभरातील – आंबा खवय्यांना वेड लावणाऱ्या कोकण हापूसचा 5 हंगाम यंदा दोन महिने उशिराने सुरू होत असतानाच आता नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये विदेशी आंब्याचा पाहुणचार सुरू झाला आहे. आफ्रिका * खंडातील मलावी देशातून हापूस आणि टॉमी अॅटकिन्स या आंब्याचे 1 हजार 215 बॉक्स आज मार्केटमध्ये आले. परदेशातून आलेला हा पाहुणा आंबा हातोहात विकला गेला. एका बॉक्सला तीन हजारांपासून पाच हजार रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.
आफ्रिका खंडातील मलावी देशातील हवामान हे कोकणातील हवामानाशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे त्या देशात कोकणातील हापूस आंब्याचे कलम नेऊन तिथे बागा तयार करण्यात आल्या आहेत. या आंब्याचा आकार कोकण हापूसपेक्षा लहान असला तरी चव मात्र हापूससारखीच आहे. त्यामुळे या आंब्याला जगभरात चांगली मागणी आहे. या मलावी हापूसचे 945 बॉक्स आणि टॉमी अॅटकिन्स या आंब्याचे 270 बॉक्स आज एपीएमसी मार्केटमध्ये आले. एका बॉक्समध्ये आंब्याच्या आकारानुसार 10, 12 आणि 14 फळे आहेत.
दुसरा लॉट शनिवारी येणार
गेल्या काही वर्षांपासून मलावी हापूस नियमितपणे एपीएमसी मार्केटमध्ये येत आहे. यंदा हा सिझन आजपासून सुरू झाला. पहिल्या लॉटमध्ये आलेला आंबा आज हातोहात विकला गेला आहे. आता दुसरा लॉट येत्या शनिवारी येणार आहे. त्यानंतर मलावी हापूसची नियमित आवक मार्केटमध्ये सुरू होणार आहे. या आंब्याच्या एका बॉक्सचे वजन सुमारे चार किलो आहे. या आंब्याला चांगला दर मिळत असल्याची प्रतिक्रिया एपीएमसीचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे.