अफगाणिस्तानचा कसोटीसह मालिका विजय

पहिल्या डावात 86 धावांची पिछाडी आणि त्यानंतर रहमत शाह आणि इस्मत आलम यांनी झुंजार शतके झळकवत अफगाणिस्तानने झिम्बाब्वेसमोर 278 धावांचे आव्हान उभारले होते. काल राशीद खानच्या फिरकीपुढे झिम्बाब्वेची 8 बाद 205 अशी नाजूक अवस्था होती. त्यांचा संघ विजयापासून 73 धावा दूर होता. पण आज खेळ सुरू होताच अवघ्या दहा मिनिटांत झिम्बाब्वेचे तळाचे दोन्ही फलंदाज एकाही धावेची भर न घालता कालच्याच धावसंख्येवर बाद झाले आणि अफगाणिस्तानने दुसरा कसोटी सामना 72 धावांनी जिंकत दोन कसोटी सामन्यांची मालिकाही 1-0 ने जिंकली. विशेष म्हणजे, आशिया खंडाबाहेर प्रथमच कसोटी मालिका खेळणाऱ्या अफगाणिस्तानने आपल्या पहिल्याच दौऱ्यात कसोटीसह मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 11 वी कसोटी खेळत असलेल्या अफगाणिस्तानचा हा चौथा कसोटी विजय ठरला आहे.

पहिल्या डावात 94 धावांत 4 विकेट टिपणाऱ्या राशीद खानने दुसऱ्या डावात 66 धावांत 7 विकेट टिपले आणि सामन्यात तिसऱ्यांदा दहापेक्षा अधिक विकेट टिपण्याचा पराक्रम केला. त्याने सलग कसोटीत दहा विकेट टिपण्याचाही विक्रम रचला. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, तब्बल तीन वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या राशीदने आपल्या सहा कसोटी सामन्यांच्या कारकीर्दीत आतापर्यंत 45 विकेट टिपले आहेत. झिम्बाब्वेच्या दुसऱ्या डावात कर्णधार क्रेग एरविनने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. सामन्यात 11 विकेट घेणारा राशीद सामनावीर, तर 392 धावा करणारा रहमत शाह मालिकावीर ठरला.