अफगाणिस्तानने युगांडाला चिरडले; युगांडाचा 58 धावांत खुर्दा पाडत सव्वाशतकी विजय

अफगाणिस्तानने आपला पहिलाच टी-20 वर्ल्ड कप सामना खेळत असलेल्या नवख्या युगांडाने अक्षरशः चिरडले. इब्राहिम झदरान आणि रहमानुल्लाह गुरबाज यांची 154 धावांची भागी आणि त्यानंतर वेगवान गोलंदाज फझलहक फारुकीच्या भेदक गोलंदाजीपुढे युगांडाचा 58 धावांत खुर्दा पाडत टी-20 वर्ल्ड कपमध्ये सव्वाशतकी विजय नोंदवला.

फारुकीचा घातकी मारा
अफगाणींच्या 184 धावांच्या आव्हानाचा युगांडाचे फलंदाज पाठलागच करू शकले नाही.फझलहक फारुकीने डावाच्या दुसऱया चेंडूंवर दिलेल्या धक्क्याने युगांडाचा डाव जो हादरला तो पुन्हा सावरलाच नाही. तिसऱया चेंडूवर रॉजर मुसाकाला पायचीत केले. मग आपल्या तिसऱया षटकांत तीन चेंडूंत दोन विकेट टिपत युगांडाची 5 बाद 18 अशी दारुण अवस्था करत आपला मोठा विजय निश्चित केला. पुढे रियाजत अली आणि रॉबीनसन ओबुया यांनी 29 धावांची भागी रचून संघाची पडझड रोखली. पण ही जोडी फुटताच 11 धावांत त्यांचे उर्वरित चार फलंदाजही बाद करून अफगाणिस्तानने 125 धावांच्या मोठय़ा विजयावर शिक्कामोर्तब केले. फारुकीने 9 धावांत युगांडाचा अर्धा संघ गारद करत आपली सर्वोत्तम कामगिरी केली. राशीद आणि नवीनुल हकनेही प्रत्येकी दोन-दोन विकेट टिपल्या.

आकडेमोड

अफगाणिस्तानने युगांडावर मिळवलेला 125 धावांचा विजय हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील त्यांचा दुसरा मोठा विजय ठरला. याआधी त्यांनी स्कॉटलंडला 130 धावांनी हरवले होते.

फझलहक फारुकीने 9 धावांत 5 विकेट घेत अफगाणिस्तानसाठी दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी 2017 साली राशीद खानने आयर्लंडविरुद्ध 3 धावांत 5 विकेट टिपले होते. फारुकीची कामगिरी टी-20 वर्ल्ड कपमधील चौथी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

इब्राहिम झदरान आणि रहमानुल्लाह गुरबाज यांनी सलामीसाठी केलेली 154 धावांची भागी टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील दुसरी सर्वोत्तम भागी. ते विश्वविक्रमी भागीपासून 16 धावा भागी राहिले. 2022 साली जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी हिंदुस्थानविरुद्ध 170 धावांच्या भागीचा विश्वविक्रम रचला होता.

झदरान-गुरबाजची दीडशतकी सलामी
त्याआधी आपला पहिलाच वर्ल्ड कप सामना खेळत असलेल्या युगांडाने टॉस जिंकला आणि अफगाणी सलामीवीरांना फलंदाजीची संधी देण्याचा निर्णय घेतला. ज्याचा झदरान आणि गुरबाजने जबरदस्त लाभ उठवला. दोघांनीही युगांडाच्या कमकुवत गोलंदाजीला पह्डून काढत आधी अर्धशतकी, मग शतकी आणि शेवटी दीडशतकी भागी रचली. एवढेच नव्हे तर दोघांनीही आपापली अर्धशतके साकारली. दोघांनी अफगाणिस्तानसाठी विक्रमी सलामी देताना 154 धावांची भागी रचली. ही जोडी 15 व्या षटकांत फुटल्यानंतर अफगाणिस्तानच्या डावाला घसरण लागली. परिणामतः पुढील 33 चेंडूंत त्यांना 29 धावांच काढता आल्या. झदरानने 46 चेंडूंत 70 तर गुरबाजने 45 चेंडूंत 76 धावा ठोकल्या. दोघेही 2 धावांच्या अंतरात पाठोपाठ बाद झाले. कॉसमॉस क्येवुता आणि ब्रायन मसाबा यांनी दोन-दोन विकेट टिपल्यामुळे अफगाणिस्तानची मजल 5 बाद 183 धावांपर्यंत पोहोचू शकली.