ऑस्ट्रेलियाला पाऊस पावला, अफगाणिस्तानचे उपांत्य फेरीचे स्वप्न भिजले; आफ्रिकेचेही उपांत्य फेरीतील स्थान जवळजवळ पक्के

चॅम्पियन्स ट्रॉफीत पाऊसच चॅम्पियन्ससारखा मुसळधार खेळतोय. पाकिस्तानात चार दिवसांत तिसरा सामना पावसाने जिंकला. मात्र आजच्या पावसामुळे ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले असून दुसरा संघ म्हणून दक्षिण आफ्रिकाही उपांत्य फेरीत जवळजवळ पोहोचलीच आहे. केवळ इंग्लंडने त्यांचा 200 पेक्षा अधिक धावांनी पराभव करण्यात यश मिळवले तर अफगाणिस्तानसाठी उपांत्य फेरीचे द्वार उघडले जाऊ शकतात. तूर्तास हे अशक्य नसले तरी इंग्लंडसाठी इतका मोठा विजय मिळवणे अवघड आहे. त्यातच ज्या अफगाणिस्तानने इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले, त्यांनी उपांत्य फेरीत धडक मारावी म्हणून इंग्लंड इतक्या मोठय़ा विजयासाठी प्रयत्नही करणार नाही. त्यामुळे अफगाणिस्तानसाठी केवळ चमत्कारच उपांत्य फेरीत पोहोचवू शकतो.

आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यात आफगाणिस्तानने टॉस जिंकताच ढगाळ वातावरणाचा फायदा उठवण्यासाठी प्रथम फलंदाजी घेतली आणि अपयशी सुरुवातीनंतरही सेदिकुल्लाह अटल (85) आणि अझमतुल्लाह ओमरझाई (67) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर 50 षटकांत ऑस्ट्रेलियासमोर 274 धावांचे आव्हान उभारले होते. अझमतुल्लाहने शेवटच्या क्षणी 5 षटकारांची आतषबाजी करत 63 चेंडूंत 67 धावा ठोकत संघाला 273 धावांपर्यंत नेले. त्याने सेदिकुल्लाहसह 68 धावांची भागी केली. त्यानंतर शेवटची 19 षटके खेळपट्टीवर उभे राहत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. अफगाणींच्या 274 धावांचा पाठलाग करताना ट्रव्हिस हेडची (नाबाद 59) फटकेबाजी पाहता ऑस्ट्रेलिया मोठा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात होती. 12.5 षटकांतच 1 बाद 109 मजल मारल्यानंतर सामन्यावर अफगाणी गोलंदाजीऐवजी पावसाने हल्ला केला आणि सामन्याला पुढे होऊच दिले नाही. अखेर तासाभरानंतर पंचांनी सामना निकालाविना रद्द केला. हा सामना रद्द झाल्यामुळे अफगाणिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपल्यातच जमा आहे. उद्या दक्षिण आफ्रिका हरो किंवा जिंको उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ दक्षिण आफ्रिकाच असेल. केवळ अफगाणिस्तानच्या सुदैवाने इंग्लंडने 200 पेक्षा अधिक धावांनी पराभव केला तरच आफ्रिका स्पर्धेबाहेर फेकला जाऊ शकतो. हा चमत्कार उद्या होणे कठीण आहे.