>> अॅड. प्रतीक राजूरकर
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघाला 20 पर्यटक वाहनांनी घेरल्याचा नुकताच घडलेला प्रकार धक्कादायक आहे. राज्यात-देशात व्याघ्र दर्शनाची व्यवस्था निर्माण झाली आहे, मात्र तेथे शिस्तीचे पालन व्हायला हवे. ही जबाबदारी वन विभागाची आणि पर्यटकांचीसुद्धा आहे. माणसांच्या गर्दीत हरवलेल्या वाघाला आता माणसांच्या गर्दीची सवय झाल्याचे ते उदाहरण आहे. कमी होत चाललेल्या वन क्षेत्रात वाघांची वाढलेली संख्या हा चिंतेचा विषय आहेच, शिवाय जंगलातील पर्यटकांच्या अनियंत्रित गर्दीने नव्या चिंतेत भर घातलेली आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघाला 20 पर्यटक वाहनांनी घेरल्याचा फोटो नुकताच प्रकाशित झाला. जवळपास दीडशेपेक्षा अधिक पर्यटकांची वाघाला बघण्याची धडपड वाघाच्या वलयांकित अस्तित्वाची प्रचीती देणारी आहे. माणसांच्या गर्दीत हरवलेल्या वाघाला आता माणसांच्या गर्दीची सवय झाल्याचे ते उदाहरण आहे. कमी होत चाललेल्या वन क्षेत्रात वाघांची वाढलेली संख्या हा चिंतेचा विषय आहेच, शिवाय जंगलातील पर्यटकांच्या अनियंत्रित गर्दीने नव्या चिंतेत भर घातलेली आहे. एकूण काय तर गर्दी हा चिंतेचा विषय केंद्रस्थानी आहे. वन क्षेत्रालगत गावात आलेल्या वाघाला पिटाळून लावणारी गर्दी अथवा पर्यटक म्हणून वन क्षेत्रात वाघाचे आकर्षण म्हणून झालेली गर्दी, दोन्ही प्रसंग हे परस्पर विरोधाभास दर्शवणारे आहेत. अर्थातच वन क्षेत्रालगत वाघांचे भ्रमण हा संवेदनशील विषय आहे. त्याकडे दोघांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच बघावे लागेल. तरीसुद्धा या गर्दीतून मार्ग कसा काढायचा हे एक मोठे आव्हान वाघांच्या समक्ष उभे ठाकले आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन संस्थेने ताडोबात घडलेल्या प्रकारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून पर्यटनाचा अतिरेक असे वर्णन केले आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन संस्था ही केंद्रीय वने व पर्यावरण विभागाशी निगडित असून देशातील व्याघ्र प्रकल्पांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असते. ताडोबात जो प्रकार घडला तो टी 114 या वाघिणीच्या बाबतीत घडलेला आहे. व्याघ्र पर्यटनात अनियंत्रित गर्दीमुळे वाघांना वाट मिळू न देण्याचे प्रकार या अगोदरसुद्धा घडलेले आहेत. व्याघ्र पर्यटनाच्या बाबतीत पर्यटकांना, भ्रमंती करताना वाहनचालकांना शिस्त असावी यासाठी अनेक नियम करण्यात आले असून याबाबतीत नियमांचे उल्लंघन होताना दिसते. वाघांना त्रास होऊ नये म्हणून वाघ आणि वाहनात विशिष्ट अंतर ठेवणे व वाघाला भ्रमण करताना वाहनांचा अडथळा होऊ नये यासाठी काळजी घेणे इत्यादी अनेक मार्गदर्शक सूचना आहेत. एकाच मार्गावर वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून पर्यटकांना वन क्षेत्रात प्रवेश करताना वेगवेगळे मार्ग देणे याची काळजी घेतली जाते, परंतु वाघाच्या भोवतालची गर्दी कमी झालेली नाही.
2023 सालच्या गणनेनुसार ताडोबात 93 वाघांचे अस्तित्व आहे. ताडोबाचे एकूण वन क्षेत्र हे 625 चौरस कि. मी क्षेत्रात विस्तारलेले आहे. एकूण वन क्षेत्राचा विचार करता ताडोबातील वाघांची संख्या अधिक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. ताडोबात हमखास व्याघ्र दर्शन होण्यास ताडोबाची भौगोलिक स्थिती अनुकूल असल्याने व्याघ्र पर्यटनासाठी ताडोबाला पर्यटकांचे नेहमीच प्राधान्य मिळत आले आहे. पर्यटकांची वन क्षेत्रात गर्दी अनियंत्रित होऊ नये यासाठी ताडोबा अतिसंरक्षित वन क्षेत्रात एकूण सहा प्रवेशद्वार आहेत, तर बफर वन क्षेत्र मिळून पर्यटकांना एकूण 14 ठिकाणांहून ताडोबा वन क्षेत्रात पर्यटनासाठी प्रवेश घेता येतो. प्रत्येक प्रवेशद्वारावर पर्यटक वाहनांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. गेल्या काही वर्षांत वन विभागाने व्याघ्र संवर्धनापेक्षा व्याघ्र पर्यटनाकडे अधिक लक्ष केंद्रित केल्याची टीका होऊ लागली आहे. पर्यटकांचा वाढता ओघ बघता पर्यटकांच्या प्रवेशाची संख्या दरवर्षी वाढवली जाते. अगदी रेल्वेच्या आरक्षणाप्रमाणे दोन-तीन महिने अगोदर पर्यटकांची प्रवेश मिळावा यासाठी रीघ लागलेली असते. त्यातही शनिवार, रविवार या दिवशी प्रवेश शुल्क आणि इतर दिवसांचे प्रवेश शुल्क यात बरीच तफावत आहे.
व्याघ्र पर्यटनात प्रचंड प्रमाणात झालेली वाढ सकारात्मक आहे यात वाद नाही. परंतु ती वाढ होण्यामागे वन क्षेत्रालगत पंचतारांकित सोयिसुविधांनी सुसज्ज असलेले रिसॉर्ट, हॉटेलसुद्धा निमित्त ठरली आहेत. समाज माध्यमांनी जंगलातील वाघ हा आपल्या बोटांवर चालेल अशी परिस्थिती निर्माण केली आणि वाघांचे आकर्षण वाढले. याची देही याची डोळा वाघाला आपल्या दृष्टीत कैद करता यावे ही पर्यटकांची इच्छा भरमसाट खर्च करून पूर्ण करता येते. अनेकदा व्याघ्र पर्यटनात तासन्तास भ्रमंती केल्यावर वाघ दिसत नाही. अशा परिस्थितीत जिथे वाघ असेल तिथे पर्यटकांची गर्दी जमा होते. धकाधकीच्या आयुष्यात दोन क्षण विश्रांतीसाठी पर्यटन हा उत्तम पर्याय आहे. कष्टाने कमावलेल्या आणि पर्यटनासाठी खर्च केलेल्या पैशांचे चीज व्हावे ही प्रत्येक पर्यटकाची इच्छा अगदी रास्त आहे. परंतु हे सगळे करत असताना वन क्षेत्रात वाघांना त्याचा त्रास होऊ नये आणि या गर्दीत कुठलीही अघटित घटना घडू नये याची शिस्त व काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. इतर वन्य जिवांसाठी अनियंत्रित गर्दी कधी बघण्यास मिळत नाही. त्यात वाघ हा इतर प्राण्यांप्रमाणे भिडस्त स्वभावाचा नाही. तो बसला तर बसला आणि चालला तर चार-चार किलोमीटर डौलाने चालत असतो.
त्यामागे पर्यटकांची वरात गर्दीला निमित्त ठरते. अशा वेळी रांगेत शेवटच्या वाहनातील पर्यटकांना एकदा डोळे भरून वाघ दिसावा यासाठी वाहनचालक विशेष ‘दखल’ घेतात. गाईड, वाहनचालकांच्या घरची चूल पेटवणारे व पर्यटकांच्या पैशांचे मूल्य व्याघ्र दर्शनात दडलेले आहे. व्याघ्र दर्शनाची व्यवस्था निर्माण झाली आहे, मात्र त्याचे शिस्तीत पालन व्हायला हवे. ही जबाबदारी वन विभागाची आणि पर्यटकांचीसुद्धा आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघाला 20 पर्यटक, वाहनांनी घेरल्याचा नुकताच घडलेला प्रकार पर्यटनाच्या काळात होऊ शकतात, कदाचित पुढेसुद्धा होतील. त्यावर टीका होईलही, परंतु वाघाला त्याचा त्रास झाला तरी त्याचे मन मोठे आहे. ते सहन करण्यासाठी काळीजसुद्धा वाघाचेच हवे. आपण फक्त काळजी करू शकतो.