ए पश्या ××× …. म्हणत वकिलांकडूनच प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न; प्रचंड पोलीस बंदोबस्तात घडला प्रकार

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या शिवद्रोही प्रशांत कोरटकरला न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही शिक्षा सुनावल्यानंतर त्याला न्यायालयातून घेऊन जात असताना एका वकिलानेच त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे पश्या ××× म्हणत धावून जाणाऱ्या या वकिलाला पोलिसांनी वेळीच रोखून ताब्यात घेतले. अमित कुमार भोसले (रा. हुपरी, ता.हातकणंगले) असे या वकिलाचे नाव आहे.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊबाबत अवमानकारक विधान करत नागपूरच्या प्रशांत कोरटकरने दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषा वापरली होती. त्याच्या विरोधात कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर तक्रार झाली होती. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळल्यानंतर तो पळून गेला होता.

महिन्याभरानंतर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात जाऊन लपलेल्या कोरटकरच्या मुसक्या आवळल्या. हातात पायतान घेऊन कोल्हापुरी हिसका दाखविण्यासाठी संतप्त झालेल्या शिवसैनिकांना चकवा देत पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या मागील दरवाज्यातून निघून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुद्धा मागच्या दरवाजाने हजर केले होते. दुपारी त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पुन्हा पोलीस वाहनातून घेऊन जाताना त्याच्यावर दोघा शिवप्रेमींनी पोलीस वाहनाजवळच हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता तो थोडक्यात बचावला होता.

दरम्यान, शुक्रवारी त्याची तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. शिवप्रेमींचा संताप पाहता पोलिसांनी दुपार ऐवजी त्याला सकाळी आठच्या सुमारास न्यायालयात कडक पोलीस बंदोबस्तात आणले. दिवसभर ही सुनावणी होईपर्यंत न्यायालयीन कामकाजा व्यतिरिक्त कोणालाही आत सोडण्यात येत नव्हते. तर गेल्या वेळी ज्या शिवप्रेमीने हल्ल्याचा प्रयत्न केला होता त्या जयदीप शेळके याला न्यायालय परिसरातच पोलिसांनी सकाळी ताब्यात घेऊन अक्षरशः फरफटत नेऊनपोलीस वाहनात जबरदस्तीने बसविले. यावेळी त्या शिवप्रेमीचा शर्टही फाटला होता

सुनावनीवेळी दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने कोरकरला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यानंतर त्याला अडीचच्या सुमारास पोलीस पुन्हा एकदा न्यायालयाच्या मागच्या दरवाज्यातून घेऊन जात असताना कॅन्टीन परिसरात अमित कुमार भोसले या वकिलाने ऐ पश्या ××× म्हणत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला झडप घालून बाजूला नेले. यामुळे काही काळ कोर्ट परिसरात तणाव निर्माण झाला होता.