अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची न्यायालयाच्या नियंत्रणाखाली सखोल चौकशी व्हावी, यासाठी अॅड. असीम सरोदे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या मतानुसार एन्काऊंटर हा खूनच असतो. एन्काऊंटरचे समर्थन करणारे लोकशाही व्यवस्थेत राहण्याच्या योग्यतेचे नाहीत. अक्षय शिंदे मारला गेल्याचे वाईट वाटत नाही. मात्र त्याला न्यायालयीन प्रक्रियेतून शिक्षा व्हायला हवी होती. बदलापुरातील लैंगिक अत्याचाराच्या घटनेची इतर कुठेही पुनरावृत्ती घडू नये यासाठी गाईडलाईन्स तयार करता आली असती, अशी प्रतिक्रिया अॅड. सरोदे यांनी दिली.
अक्षय शिंदेला एन्काऊंटरमध्ये मारून या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला आहे. बदलापुरात लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या शाळेच्या व्यवस्थापनातील लोक भाजप व आरएसएसशी संबंधित आहेत. त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणूनच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप अॅड. सरोदे यांनी केला. शाळेच्या व्यवस्थापनातील इतरांवर कारवाईची मागणी पीडित मुलींच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी ही मागणी सोडून द्यावी, यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आम्ही शाळा व्यवस्थापनातील इतर आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार आहोत, असेही अॅड. सरोदे यांनी स्पष्ट केले. ते बदलापूरच्या घटनेतील दोन पीडित मुलींच्या वतीने न्यायालयात बाजू मांडत आहेत.