
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मीक कराडच असून हे सर्व प्रकरण संघटित गुन्हेगारीतून घडल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी मकोका न्यायालयासमोर केला. त्यांनी सीसीटीव्ही, सीडीआर तसेच इतर महत्त्वाचे पुरावे सादर केले. पुढील सुनावणी आता 10 एप्रिल रोजी होणार आहे.
देशमुख हत्येप्रकरणी न्या. व्यंकटेश पाटवदकर यांच्या समोर सुनावणी सुरू झाली. हत्येचा कट कसा रचण्यात आला, मास्टरमाइंड कोण याचे सविस्तर विवेचन त्यांनी केले. 1 डिसेंबर रोजी नांदूरघाट येथील तिरंगा ढाब्यावर वाल्मीक कराडने आरोपींना काय करायचे याची स्पष्ट सूचना दिली होती. सुदर्शन घुले हा या टोळीचा म्होरक्या, तो वाल्मीक कराड सांगेल तसेच करत होता हे देखील अॅड. निकम यांनी निदर्शनास आणले.
कृष्णा आंधळेचा कराड, चाटे यांना तीनदा फोन
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अॅड. उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदाच आरोपींमध्ये झालेल्या मोबाईल संभाषणाचे पुरावे न्यायालयासमोर आणले. यात फरार आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे या दोघांना तीनदा मोबाईलवरून कॉल केल्याचे उघड झाले आहे. या घटनेच्या अगोदर सुदर्शन घुले याने अवादा पंपनीच्या वॉचमनलाही मारहाण केली होती.