सोमय्या विद्यापीठात 11 वीच्या अ‍ॅडमिशनचा झोल, तीन महाविद्यालयांच्या लिपिकांचे साटेलोटे आणि पैशांसाठी गद्दारी

विद्याविहार येथील सोमय्या विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या तीन महाविद्यालयांमध्ये चालू शैक्षणिक वर्षाच्या 11वीसाठी 49 विद्यार्थ्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे अ‍ॅडमिशन मिळवून देण्यात आले असल्याचा मोठा झोल समोर आला आहे. हा अ‍ॅडमिशन झोल अन्य कोणी नाही तर महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या लिपिकांनीच संगनमताने केला आहे. झटपट पैसा कमविण्यासाठी महाविद्यालयांशी गद्दारी करणाऱ्या दोघा लिपिकांना टिळक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात किती पैशांचा झोल झालाय याचा तपास सुरू आहे. एका खासगी डीटीपी ऑपरेटरलादेखील अटक करण्यात आली.

सोमय्या विद्यापीठाअंतर्गत तीन महाविद्यालयांमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावीसाठी काही विद्यार्थ्यांचे बनावट गुणपत्रिका व शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या आधारे अ‍ॅडमिशन केल्याची गंभीर बाब समोर आली. याची दखल घेत के.जे. सोमय्या कॉलेजचे प्राचार्य डॉ. किशन पवार (54) यांनी महाविद्यालया अंतर्गत कागदपत्रांची तपासणी करण्याकरिता स्पुटिनी समिती स्थापन केली. या समितीने केलेल्या तपासणीत जवळपास 49 विद्यार्थ्यांचे अकरावीचे अ‍ॅडमिशन हे बनावट कागदपत्रांच्या आधारे झाले असल्याचे व हा झोल महाविद्यालयातील लिपिकांनी केल्याचे स्पष्ट झाले.

डॉ. किशन पवार यांनी याविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात लिपिक महेंद्र पाटील, अर्जुन राठोड, कमलेशभाई, जितुभाई, बाबुभाई यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर प्रभारी निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बाचेवाड, उपनिरीक्षक आत्माराम राठोड व पथकाने केलेल्या चौकशीत अ‍ॅडमिशनचा झोल उघड होताच सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सोमय्या महाविद्यालयामध्ये लिपिकाचे काम करणारे महेंद्र पाटील, अर्जुन राठोड तसेच खासगी डीटीपी ऑपरेटरचे काम करणारा देवेंद्र सादये यांना अटक केली. तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

महेंद्र, अर्जुन व अन्य आरोपींनी सोमय्या महाविद्यालयांमध्ये अ‍ॅडमिशन मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना हेरून त्यांना मॅनेजमेंट कोट्यातून अ‍ॅडमिशन मिळवून देऊ असे सांगत बनावट गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला बनवून त्या आधारे 49 विद्यार्थ्यांना इयत्ता 11वीचे अ‍ॅडमिशन मिळवून दिले होते. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून आरोपींनी किती रक्कम घेतली याचा पोलीस शोध घेत आहेत.

अ‍ॅडमिशनचा झोल करणाऱ्या आरोपींनी घाटकोपर येथे डीटीपीचे काम करणाऱ्या देवेंद्र सहाये याच्याकडून बनावट गुणपत्रिका व शाळा सोडल्याचे दाखले बनवून घेतले होते.