
मुंबई महानगरपालिकेसह सर्वच महापालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश आता केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. यामुळे अकरावी प्रवेशातील गैरकारभार थांबणार असून सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना हक्काचे कॉलेज मिळणार आहे. शिवाय संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराला आळा बसणार आहे.
अकरावीचे प्रवेश हे गुणवत्तेच्या आधारावरच केले जावेत यासाठी न्यायालयाने दिलेले आदेशानंतर 2009-2010 या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, ठाणे व रायगड जिह्यातील मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले होते. त्यात काही सुधारणा करून मुंबईसह इतर पाच महापालिका क्षेत्रामध्ये हे प्रवेश सुरू करण्यात आले होते. त्यातील काही उणिवा आणि यश लक्षात घेऊन अकरावीचे सर्वच प्रवेश ऑनलाईन पद्धतीने केल्यास गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, असा अहवाल पुण्यातील ‘सिस्कॉम’ संस्थेने शालेय शिक्षण विभागाला सादर केला होता. त्यामुळे संपूर्ण ऑनलाईनचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेवर शालेय शिक्षण आयुक्त आणि कार्यालयाचे पूर्ण नियंत्रण राहणार आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच ऑनलाईन प्रवेशाबाबत सरकारला वेळोवेळी या विषयाचे अहवाल सादर करण्यात आले होते. उशिरा का असेना, परंतु आता राज्यभरात अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याचे आम्ही स्वागत करतो.
n वैशाली बाफना, शिक्षण प्रमुख, सिस्कॉम, पुणे
शासन म्हणते…
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे महत्त्व लक्षात घेऊन सरकारने जाहीर केलेल्या सात कलमी कृती उद्दिष्टांमध्ये विद्यार्थी व पालकांचे जीवनमान सुखकर बनविणे, यासाठी खर्च होणारा वेळ, पैसा व श्रम याचा अपव्यय टाळण्यासाठी ऑनलाईन प्रवेश पद्धत राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.