प्रीतीश नंदी यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार-संपादक, प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कवी, लेखक आणि शिवसेनेचे माजी राज्यसभा सदस्य प्रीतीश नंदी यांचे बुधवारी मुंबईतील निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे माध्यम क्षेत्र आणि चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

प्रीतीश नंदी यांचे पत्रकारिता, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातील योगदान मोठे होते. 1980च्या दशकात ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’, ‘द इंडिपेंडंट’ आणि ‘फिल्मफेअर’ यांसारख्या प्रतिष्ठत मासिकांचे संपादक म्हणून त्यांनी धुरा वाहिली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ समूहाचे ते प्रकाशन संचालकही होते.

विपुल लेखन

प्रीतीश नंदी यांच्या कवितांची इंग्रजी भाषेतील चाळीसहून अधिक पुस्तके आहेत. त्यांनी बंगाली, उर्दू आणि पंजाबी भाषेतील इतर लेखकांच्या कविता तसेच उपनिषदाच्या नवीन आवृत्तीचे भाषांतर केले.

चित्रपटसृष्टीतही मोठे योगदान

1993 मध्ये त्यांनी प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्स कंपनीची स्थापना केली. द प्रीतीश नंदी शो हा कंपनीने निर्मित केलेला पहिला टॉक शो होता. हा शो प्रीतीश नंदी होस्ट करत. या शोमध्ये त्यांनी अनेक दिग्गज सेलिब्रेटींच्या मुलाखती घेतल्या. चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. कुछ खट्टी कुठ मिठी, बॉलीवूड कॉलिंग, सूर, झंकार बिट्स, मुंबई मॅटिनी, चमेली, पॉपकॉर्न खाओ मस्त हो जाओ, शब्द, हजारो ख्वाहिशे ऐसी, एक खिलाडी एक हसीना, कांटे, आँखे, जस्ट मॅरिड, अग्ली और पगली, प्यार के साईड इफेक्ट्स, मस्तिझादे अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. अलिकडेच त्यांच्या कंपनीने फोर मोर शॉट्स प्लीज, मॉडर्न लव्ह मुंबई या वेबसिरिजचीही निर्मिती केली.

पुरस्कार

1977 मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ईएम फोर्स्टर साहित्य पुरस्कार, जेनेसिस अॅवार्ड्स, अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय मानवतावादी पुरस्कार, बांगलादेश मुक्ती युद्ध पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला.

जिवलग मित्र गमावला – अनुपम खेर

प्रीतीश नंदी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना अभिनेते अनुपम खेर म्हणाले, माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या प्रीतीश नंदी यांच्या निधनाबद्दल मला अतीव दुŠख होत आहे. एक अद्भुत कवी, लेखक, चित्रपट निर्माता, एक धाडसी संपादक आणि पत्रकार आपण गमावला. माझ्या मुंबईतील सुरुवातीच्या उमेदीच्या काळात ते माझे प्रेरणास्रोत होते. आम्ही अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या आहेत, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

शिवसेनेचे राज्यसभा सदस्य

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रीतीश नंदी यांना राज्यसभेवर संधी दिली होती. 1998मध्ये ते शिवसेनेचे राज्यसभा सदस्य झाले. सहा वर्षांच्या कार्यकाळात संसदेच्या विविध प्रमुख समित्यांवर त्यांनी जबाबदारी पार पाडली.