रेसकोर्सच्या मोकळय़ा जागेवर एक वीटही रचू देणार नाही! आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला इशारा

दोन-तीन व्यक्ती मुंबईकरांच्या हक्काची शेकडो एकर जागा बिल्डरला कशी देऊ शकतात?

मुंबईकरांच्या हक्काची शेकडो एकर जागा केवळ दोन-तीन व्यक्तींच्या मर्जीने ‘बिल्डर कंत्राटदार सरकार’च्या घशात घालू देणार नाही. या जमीन घोटाळ्याविरोधात मुंबईकरांसोबत आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर लढा दिला जाईल.

महालक्ष्मी रेसकोर्स येथील मुंबईकरांच्या हक्काची शेकडो एकर मोकळी जागा ‘बिल्डर-कंत्राटदार सरकार’च्या घशात घालण्याचा मिंधेंचा डाव आहे. यासाठी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी ‘सह्याद्री’वर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचे काही अधिकारी व पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत गेल्या 6 डिसेंबरला गुप्त बैठक घेतली. 91 एकर जागा ‘आरडब्ल्यूआयटीसी’ला देऊन इतर जागा पालिकेच्या माध्यमातून विकसित करण्याबाबत निर्णायक बोलणी तेव्हा झाल्याचे कळते. मात्र मुंबईकरांच्या हक्काच्या जागेवर एक वीटही रचू देणार नाही, असा इशारा शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दिला.

आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर या गुप्त बैठकीचा भंडाफोड करीत मिंधे सरकारचा डाव उघड केला आहे. 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ही बैठक झाली. या वेळी रेसकोर्सच्या 226 एकर जागा बिल्डर-कंत्राटदारांच्या घशात घालण्यासाठी बोलणी झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यानुसार 226 एकर जागेपैकी ‘आरडब्ल्यूआयटीसी’ला 91 एकर जागा देऊन रेसकोर्सवरील तबेले बांधण्यासाठी तब्बल 100 कोटी देण्याबाबत सहमती झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र करदात्या मुंबईकरांच्या कष्टाच्या आणि हक्काच्या पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी का केली जाते, असा सवाल त्यांनी केला आहे. हा खर्च ‘आरडब्ल्यूआटीसी’च्या व्यवस्थापनाने करणे आवश्यक आहे. मात्र हा खर्च पालिका का करते असा सवालही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय इतर सदस्यांच्या गळी उतरवण्यासाठी पालिका आयुक्तांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सादरीकरण करण्याचा निर्णयही झाल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रश्नांची उत्तरे द्या!

‘आरडब्ल्यूआयटीसी’च्या सर्व सदस्यांना रेसकोर्सची सर्व जागा हडपण्याच्या सरकारच्या डावाची माहिती आहे का?

जागा हडपण्यासाठी झालेल्या गुप्त बैठकांची माहिती ‘आरडब्ल्यूआरटीसी’च्या सर्व सदस्यांना आहे का?

‘आरडब्ल्यूआयटीसी’चा करार संपला असेल आणि ते जागेचा ताबा सोडण्यास तयार आहेत का?

जागेचा ताबा सोडण्यास तयार असतील तर या ठिकाणी अर्बन फॉरेस्ट, क्रीडांगणही होऊ शकते.