एकटे राहिलो तरी पुन्हा लढून जिंकून दाखवू! आदित्य ठाकरे यांचा ठाम आत्मविश्वास

गेली अडीच वर्षे शिवसेनेने गद्दारांशी संघर्ष केला. तत्पूर्वी सरकार असताना कोविड महामारीशी लढलो. महाराष्ट्र आणि मुंबईसाठी शिवसेना लढत राहील. कुणीही शिवसेना सोडून गेले तरी पर्वा नाही. आम्ही एकटे राहिलो तरी महाराष्ट्र पुढे कसा न्यायचा यावर पुन्हा लढू आणि जिंकून दाखवू, असा ठाम आत्मविश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

आदित्य ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेतून काही मंडळी मिंधे गटात जात आहेत त्यासंदर्भात यावेळी पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारले. त्यावर ते स्पष्टपणे म्हणाले की, ‘महानगरपालिका निवडणुकीपूर्वी निधीसाठी, पैशासाठी, स्वार्थासाठी किंवा गद्दारी करण्यासाठी अनेक लोक शिवसेना सोडून जातील. ज्यांना जायचेय त्यांना जाऊ द्या. शिवसेना हरणारी नाही. आम्ही महाराष्ट्र आणि मुंबईच्या भल्यासाठी लढतोय. गद्दारी करून जे पलीकडे जात आहेत ते त्यांच्या स्वार्थासाठी जात आहेत आणि मुंबई, महाराष्ट्राविरुद्ध गद्दारी करण्यासाठी जात आहेत.’

फसवून मते मिळवणे महाराष्ट्र खपवून घेणार नाही!

भाजपवाले निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण व इतर अनेक योजना बंद करतील. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? कर्जमाफी मिळालीच नाही. आता तर एक रुपयात पीक विमाही बंद करणार आहेत. अशी फसवणूक करून जनतेची मते मिळवतात. महाराष्ट्रातील जनता हे कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला.

अमित शहा स्वतःच्याच अपयशावर बोलताहेत

बांगलादेशी, रोहिंग्यांना हिंदुस्थानबाहेर काढू, असे पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना सांगतात. पण गेली दहा वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे. मग ही जबाबदारी कोणाची होती? अमित शहा पुन्हा त्यावर आश्वासन देऊन गृहमंत्री स्वतःच्याच अपयशावर बोलत आहेत का, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

लाडक्या बहिणींचे पुढच्या सहा महिन्यांचे 2100 रुपये आताच द्या!

आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या महायुती सरकारवर आदित्य ठाकरे यांनी यावेळी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने अनेक गोष्टी मोफत देण्याची आश्वासने दिली; पण सरकार आल्यानंतर सगळी भाडेवाढ सुरू आहे. आता एसटी भाडेवाढ केली. बेस्टचीही भाडेवाढ करतील. आता मुंबईत पाण्याची भाडेवाढ करणार असल्याचे महापालिकेकडून ऐकतोय. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप दिलेले नाहीत असे सांगतानाच, पुढच्या सहा महिन्यांचे 2100 रुपये आताच द्या, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.