मिंधे सरकार मंत्रालयाची जागाही गुजरातला देईल, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

घटनाबाह्य मिंधे सरकार सत्तेत राहिले तर मंत्रालयाची जागाही गुजरातला देईल, सरकारचे गुजरातप्रेम महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला

आदित्य ठाकरे यांनी आज विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मिंधे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईमधील मोक्याच्या जागा अदानी समूहाला दिल्या जात आहेत. गुजरातकडे महाराष्ट्र सरकार वळले आहे. गुजरात सांगेल तसे महाराष्ट्राचे सरकार काम करत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

गुरुवारी टीम इंडियाची रॅली काढण्यासाठी गुजरातमधून गुड्स पॅरिअरची बस आणण्यात आली होती. 2007 मध्ये अशीच रॅली काढण्यासाठी मुंबईच्या बेस्ट बसचा वापर करण्यात आला होता. आतादेखील तो करता आला असता. भाजपच्या मनात महाराष्ट्रद्वेष एवढा का आहे, हेच कळत नाही. गुजरातवर भयंकर प्रेम करा, परंतु महाराष्ट्राचा द्वेष करू नका, अशी अपेक्षा यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

विधिमंडळाबाहेरील करण्यात आलेल्या सत्ताधाऱयांच्या बॅनरबाजीवरदेखील आदित्य ठाकरे यांनी टीका केली. या बॅनरवर खोकेवाल्यांचे किंवा गद्दारांचे पह्टो लावण्यापेक्षा टीम इंडियाच्या खेळाडूंचे पह्टो लावायला पाहिजे होते. हा टीम इंडियाचा अपमान आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई लुटण्याचा कार्यक्रम भाजपकडून सर्रासपणे सुरू आहे. राज्यात तीन महिन्यांनंतर आमचे सरकार आल्यानंतर या सर्वांची आम्ही चौकशी लावणार आहोत. भ्रष्टाचारांमध्ये जो कोणी सहभागी असेल त्याला आम्ही तुरुंगात टाकणार आहोत, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.

मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरही आदित्य ठाकरे यांनी टीका केली. मुंबई महापालिका बेस्टला आर्थिक सहकार्य करत नाही. ते बेस्टऐवजी इतर गोष्टींना आर्थिक सहकार्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई महानगरपालिका एमएमआरडीए आणि रेसकोर्सला पैसे देत आहे. रेसकोर्सवर असलेल्या घोडे मालकांच्या तबेल्यांसाठी 100 कोटी रुपये खर्च करत आहे, परंतु बेस्टला नवीन बसेस घेण्यासाठी आणि कर्मचाऱयांच्या पगारासाठी आर्थिक सहकार्य केले जात नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईत आणि राज्यात उद्योजकांनी उद्योग करावा, समृद्धी आणावी, रोजगार वाढावा, नोकरी वाढवाव्यात, याला आमचे सहकार्य आहे. परंतु मुंबई आणि महाराष्ट्र गिळण्याचे उद्योग करू नये.