टँकरच्या संपामुळे मुंबईत पाणीबाणी, दोन दिवसांत पाणीप्रश्न सोडवा, अन्यथा सर्व वॉर्ड ऑफिसवर शिवसेना मोर्चा काढणार; आदित्य ठाकरे यांचा इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. पुढील 48 तासांत मुंबईतील पाणीप्रश्न सुटला नाही तर, आम्ही प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढणार, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन सगळ्यात महत्त्वाचे विषय आज असतील तर मुंबईसाठी पाण्याचा प्रश्न आहे, अर्थात हा सगळ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतोय. आणि ही सगळी परिस्थिती मुंबईतही बिकट व्हायचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईतील मोठ-मोठ्या हाउसिंग सोसायटी, बिल्डींग, चाळ सोसायटी किंवा मग रस्त्याची कामं असतील, मॉल्स आणि पायाभूत सुविधांची कामं असतील तिथे जी पाण्याची तूट असते ती भरून काढण्यासाठी साधारणपणे हे वॉटर टँकर असोसिएशन मुंबईत पाणीपुरवठा करत असतं. एक आठवडा आधीच या टँकर असोसिएशनने संप पुकारला होता. आणि त्यांच्या आंदोलनाचा काल पहिला दिवस होता आणि आजचा दुसरा होता. कालही सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला आयुक्तांना विनंती केली होती की पाण्याच्या टँकरचा संप जेव्हा पुकारला जाईल तेव्हा मुंबईवर त्याचा काय परिणाम होईल? यावर पत्रकार परिषद घेऊन मुंबई आणि मुंबईकरांना अवगत करावं की, काय त्रास सहन करावा लागणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हा विषय काही नवीन नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये या टँकर असोसिएशनने संप पुकारलेला आहे. दोन-तीन वेळा मी आवाहन केल्यानंतर त्यांनी सरकारशी बोलणी केली. ‘एसंशि’चं सरकार होतं. त्यावेळच्या आश्वासनावर त्यांनी तो संप मागे घेतला होता. तसं पाहिलं गेलं तर त्यांच्या मागण्या काही ठराविकच आहेत आणि जास्त काही मागण्या नाहीत. या मागण्यांमध्ये जास्तीत जास्त मागण्या या रास्त मागण्या आहेत. केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने भूजलाबाबत जे काही कायदे केले आहेत ते कायदे मुंबईत लागू होऊ शकत नाहीत किंवा व्यवहार्य नाहीत. असे काही कायदे त्यांनी सांगितले की, मुंबईला त्यातून सुट द्यावी. तीन वर्षांपासून आपण पाहतो सरकारडून आश्वासन मिळतंय. पण राज्य सरकारकडून प्रस्ताव केंद्र सरकारकडे जातोय की नाही जात? हा सगळा प्रश्न आहे. तांत्रिक बाबीत न जाता, पुकारलेला संप दोन दिवसांपासून सुरू आहे आणि आणखी किती दिवस चालेल हे माहिती नाही. कालही विनंती केली होती. आजही सरकारकडे आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की तातडीने या असोसिएशनला आपण भेट द्यावी. आणि भेटून त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या केंद्र सरकार समोर ठेवून तोडगा काढावा. कारण हा संप आम्ही मुंबईकरांनी किती दिवस सहन करावा? आणि पाण्याचा तुटवडा जो आहे हा किती दिवस सहन करायचा हा मोठा प्रश्न आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

गेल्या सहा सात महिन्यांमध्ये मुंबईत पाण्याची समस्या आहेच. खूप ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत. त्यात अनेक पाइपलाइन डॅमेज झालेल्या आहेत. गढूळ पाणी घरांमध्ये येत आहे. काही-काही ठिकाणी दुषित पाणी, गढूळ पाण्यासोबत येत असून त्याचा दाब कमी पडत आहे. टँकर असोसिएशने पाणी देणं बंद केल्याने अनेक बिल्डींगमध्ये पाणीच नाहीये असी परिस्थिती आदित्य ठाकरे यांनी मांडली.

एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम पुढे ढकला, आदित्य ठाकरे यांचं MMRDA ला पत्र

“बिकट आर्थिक परिस्थिती या राज्यात ‘एसंशि’ने करून ठेवली” 

यासोबत दुसरा महत्त्वाचा विषय आहे जो आपल्या राज्यासाठी आहे, तो म्हणजे एसटीचा. काल परवा आपण पाहिलं जी थट्टा सुरू झाली आहे आता सगळीकडे, असं वाटत होतं यांचं सरकार बनेपर्यंत की जबरदस्त पैसा या सरकारने गोळा केलेला आहे. त्यानंतर दावोसचा दौरा झाला, 15 लाख कोटी, 20 लाख कोटी, किती पाहिजेत अजून देतो… असे काही जमा केलेत. आणि असं वाटलं की झालं मुंबई आणि महाराष्ट्र कितीतरी ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी उद्या परवापर्यंत होईल. पण सत्य परिस्थिती ही आहे की, काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर आला नाही. आम्हाला तिथे लढा द्यावा लागला. तेव्हा आता वेळेवर पगार सुरू झालेला आहे. पण एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा फक्त 56 टक्के त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाला. या सरकारला अजून सहा महिनेही झाले नाहीत, अनेक घोषणा त्यांनी केलेल्या आहेत. कॉन्ट्रॅक्टरला देणं लागतं, तिथे थकबाकी आहे. कॉन्ट्रॅक्टरच काय मुंबई महापालिकेकडेही राज्य सरकारची जवळपास 16 हजार कोटींची थकबाकी आहे. अशी थकबाकी असताना कॉन्ट्रॅक्टरना अजून मोठी-मोठी कामं दिली जाताहेत. पण स्वतःचे जे सरकारी कर्मचारी असतील एसटीचे कर्मचारी असतील त्यांना पूर्ण पगार देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत, हे दुर्दैवं आहे. आणि कदाचित ही परिस्थिती तुम्हाला आता नाही तर पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेल. किती बिकट आर्थिक परिस्थिती या राज्यात ‘एसंशि’ने करून ठेवली आहे. अशी आहे की, आज एसटी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पगार नाही. उद्या ही वेळ कुठल्याही अधिकाऱ्यांवर किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर येईल, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

टँकर संपाने मुंबईत पाणीबाणी, लोकांचे हाल… महापालिकेचे अधिकारी सुट्टीत मस्त

काही महिन्यांपूर्वी वेतन श्रेणीवर चर्चा झाली. मग केंद्राने सातवा वेतन आयोग जाहीर केला त्याच्यानंतर राज्य सरकारने सांगितलं की आम्हीही हे सगळं करू. पण हे सगळं होत असताना जी काही वचनं मग कर्जमाफी असेल ते काही पाळलं नाही. लाडकी बहीणचं वचन पाळलेलं नाही. वेगवेगळ्या योजनांचं वचन पाळलेलं नाही. पण आता योजना सोडा, नवीन काही करण्याचं सोडा जे वर्षानंवर्षे पगार मिळत आलेले आहेत त्याच्यातही आर्धा पगार मिळालेला आहे आणि आर्धा पगार मिळालेला नाही. आज सवाल हाच उठतो की, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि जे लोकं एसटी कर्मचाऱ्यांना चिथावून रस्त्यावर आणत होते, आंदोलनासाठी आणत होते ते आज शांत का आहेत? गप्प का आहेत? आहेत तरी कुठे? तिथे सरकारमध्ये बसलेले आहेत. ते का नाही आज एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी उतरत आहेत? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि उद्या जर अशाच परिस्थितीमुळे एसटीने देखील संप पुकारला तर जे लोकं सुट्ट्यांमध्ये गावी जाणारे असतील मग त्यांची काय परिस्थिती होणार? विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. हाच इशारा सरकारला देतोय की, या दोन्ही विषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरणार आहे. लाँग विकेंड पाहून सरकारी कर्मचारी आर्धे सुट्टीवर गेलेत. मग पाण्याचं उत्तर कोण देणार? एसटीचं उत्तर कोण देणार? सगळी उत्तरं पुढच्या आठवड्यात. मग आता मुंबईकर जो तहानलेला आहे, जर पुढच्या 48 तासांत हा प्रश्न सुटला नाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष म्हणून आणि मुंबईकर म्हणून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढल्याशिवाय थांबणार नाही. तिथल्या स्थानिक वॉर्ड ऑफिसरला विचारणार की ही जबाबदारी महानगरपालिकेची होती ती जबाबदारी तुम्ही पूर्ण का नाही पार पाडली? कारण मुंबई महापालिकेला मागच्याच आठवड्यात टँकर असोसिएशन पत्र दिलं गेलं होतं, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.