
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांनी तातडीने भेट दिल्याबद्दल त्यांनी आभार मानतानाच विधिमंडळातील कामकाज होत असलेल्या पक्षपातीपणावरही टीका केली. ते म्हणाले की, यापूर्वी सभागृह अशा पद्धतीने कधीच चालत नव्हते. विधानसभा आणि विधान परिषदेचा सरकार व त्यांचे लोक अपमान करताहेत. विधानसभेत विरोधी पक्ष अनेकदा जनहिताचे विषय मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी आबू आझमी, औरंगजेब असेल किंवा अजून कुणी असेल सत्ताधारी पक्षच कामकाज ठप्प पाडतो. सभागृहात चर्चा सुरू असताना मंत्री नसतात, सचिव नसतात. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यासंदर्भात सूचना द्यावी, अशी मागणी आम्ही राज्यपालांना केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनीही सर्व मंत्र्यांना स्वतःची उत्तरे स्वतःच अभ्यासपूर्वक द्यावीत अशी समज द्यावी, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून उत्तर येणे बाकी आहे, लोकशाहीत प्रथा-परंपरा पाळून विरोधी पक्षनेता पद दिले जाईल अशी अपेक्षा करतो, असेही आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेत्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.