‘बेस्ट’ बसच्या तिकीटवाढीचा निर्णय प्रशासनाने घेतल्यास आपले सरकार आल्यानंतर आम्ही तो रद्द करू, असा ठाम विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला. भाजपच्या अधिपत्याखाली असणाऱया ‘मिंधे’ सरकारने दबावाखाली तिकीट दरवाढीसाठी हालचाली सुरू केल्याचा आरोपही त्यांनी ‘एक्स’वर केला आहे.
देशात प्रचंड वाढलेल्या महागाईने गोरगरीब-सर्वसामान्य होरपळत असताना आता मुंबई महानगरपालिकेनेही ‘बेस्ट’ला तिकीट दर वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये साध्या बसचे दर किमान पाच रुपयांवरून सात रुपये तर एसी बसचे किमान तिकीट सहा रुपयांवरून दहा रुपये होण्याची शक्यता आहे. ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे निर्देश देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या प्रस्तावित दरवाढीचा आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. भाजप मुंबईद्वेषी आहे हे आम्ही नेहमीच सांगत आलोय. प्रस्तावित भाडेवाढ म्हणजे मुंबईकरांचा खिसा कापण्याचा आणखी एक मार्ग आहे. याआधी ‘बेस्ट’ची संख्या कमी करण्यात आली. तसेच कंत्राटदारांसाठी बस थांबे ‘जाहिरातीं’चे ठिकाण बनवण्यात आले आहे. मग आता ही दरवाढ कशासाठी असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आमचे सरकार असताना आम्ही बसचे तिकीट जगात सर्वात कमी आणि परवडणारे ठेवले होते. तरीही आम्ही बसताफा दहा हजारांपर्यंत वाढवण्याचे नियोजन केले. मात्र मुंबईद्वेषी भाजपच्या काळात बस कमी आणि तिकीट दर जास्त अशी स्थिती आहे. मात्र आमचे सरकार आल्यास आम्ही तिकीट दरवाढ रद्द करू आणि पुन्हा सर्वसामान्यांना परवडण्याजोगे तिकीट दर लागू करू.