शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आज सर्वानुमते निवड करण्यात आली. शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांना विधानसभेतील गटनेते बनवण्यात आले असून मुख्य प्रतोद पदाची जबाबदारी पुन्हा एकदा आमदार सुनील प्रभू यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक आज झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. सविस्तर चर्चा करून आणि सर्व आमदारांची मते ऐकून घेऊन हा निर्णय घेतला गेला. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित 20 आमदारांचे या वेळी उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले.
बैठकीनंतर भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गटनेता म्हणून आपली निवड करण्यात आल्याचे सांगतानाच भास्कर जाधव म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात यावे, असे आपण सुचवले होते. पण उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिला. सात टर्म आपण आमदार असून विधानसभेत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडू, असे जाधव म्हणाले. सरकार सक्षमपणे चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्षनेते पद असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, इतर पक्षांप्रमाणेच शिवसेनेच्या विधिमंडळ नेत्यांची निवड करण्यात आली असून ती नियमाप्रमाणे करण्यात आली आहे.
या बैठकीला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब उपस्थित होते.
पुन्हा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू झालोय ः आदित्य ठाकरे
ही नवीन सुरुवात आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू झालोय, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी बैठकीनंतर दिली. नेता निवडीतही शिवसेनेने घराणेशाही केल्याचा मिंध्यांचा आरोप फेटाळताना, थोडीतरी लाज बाळगा, बोलायचे म्हणून बोलू नका, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. 48 तास होऊन गेले, मुख्यमंत्री कोण आहेत असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला. त्यावर माध्यमांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवावे यासाठी मिंधे गट आग्रही आहे असे सांगितले. तेव्हा भाजपचे 132 जे जिंकून आलेत ते बिचारे काय करणार? गेल्या अडीच वर्षांत त्यांना काहीच मिळाले नाही, ते असेच बसून राहणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
ते फडणवीस असले तरी आपण वीस आहोत, पुरून उरू ः उद्धव ठाकरे
ते फडणवीस असले तरी विधानसभेत आपले शिवसेनेचे वीस आमदार असतील. संख्याबळ कमी आहे, पण आपण सरकारला पुरून उरू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केला. निवडणुकीत जसे वाघासारखे लढलात तसेच महाराष्ट्रासाठी, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत सरकारवर तुटून पडा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आमदारांमध्ये चैतन्य निर्माण केले.
विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचे निकष सांगा शिवसेना आमदारांचे विधिमंडळ सचिवांना पत्र
विधानसभा विरोधी पक्ष नेता निवड कोणत्या कायद्यानुसार होते आणि त्याचे नियम काय आहेत त्यांची माहिती लिखित स्वरुपात तत्काळ द्यावी, अशी मागणी करणारे पत्र आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांनी विधिमंडळ सचिवांना दिले. मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाल्यानंतर सर्व आमदार विधिमंडळात पोहोचले. विधिमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर विधिमंडळ सचिवांची भेट घेऊन हे पत्र देण्यात आले.