भाजपला दिल्लीसाठी महाराष्ट्र महत्त्वाचा नाही, सरकार स्थापनेतील विलंबावरून आदित्य ठाकरे यांची महायुतीवर टीका

विधानसभेचा निकाल लागून दहा दिवसांनंतरही सरकार बनत नसल्याने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीही महायुतीवर टीकास्त्र सोडले आहे. भारतीय जनता पक्षाला दिल्लीसाठी महाराष्ट्र महत्त्वाचा नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

महाराष्ट्राला दुर्लक्षित करा, महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करा आणि सरकारचं गठन प्रलंबित ठेवा; सध्या महायुतीची हीच भूमिका दिसत आहे. बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे पण दिल्लीसाठी आपला महाराष्ट्र, आपलं राज्य महत्त्वाचं नाहीय हे आता स्पष्ट दिसत आहे.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, महाराष्ट्रात अजूनही सरकार बनत नाहीय; याची दोनच कारणं असू शकतात – 1) निवडणूक आयोगाने उपकार केले असले तरी सरकार बनवायची मानसिकता नाही. 2) महाराष्ट्रच आहे ना… अपमान करूया, सरकार काही दिवसांनी बसवूया, कोण काय बोलणार आहे, ही दुसरी मानसिकता!