शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विस्कळीत झालेल्या कचरा व्यवस्थापनावरून आज मिंधे सरकारवर टीका केली. मुंबईत गेली दोन वर्षे लोकप्रतिनिधी, विभाग अधिकारी नसल्याने ही परिस्थिती उद्भवली असून सरकारने हिंमत असेल तर मुंबईसह सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका लावाव्या, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले.
लातूर शहर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनासंदर्भात काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेत भाग घेताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील कचरा व्यवस्थापनाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबईतील गल्लीबोळात दोन-दोन आठवडे कचरा पडून असतो, पण नगरसेवकच नसल्याने नागरिकांनी कुणाकडे तक्रार करायची, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. 24 पैकी 15 वॉर्डांमध्ये वॉर्ड अधिकारीही नियुक्त करण्यात आलेले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
ओला व सुका कचऱयाचे विलगीकरण होत नसेल तर तो उचलला जात नाही. ‘माय बीएमसी’ नावाचे ट्विटर हॅण्डल आम्ही सुरू केले होते. पह्टो काढून नागरिकांनी त्यावर पोस्ट केले की त्यावर कारवाई करून त्याचा पह्टो नंतर आम्ही पुन्हा टाकत होतो. नुकताच आर-नॉर्थ विभागात कचऱयाचा पह्टो कुणीतरी टाकला होता, पण त्यावर दोन दिवसांत काहीच झाले नाही. दोन दिवसांनंतर कारवाई झाली, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात करताच आदित्य ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. ‘काही काही लोकांना विकास हे काय असते हे माहीत नसते. काहींना आग लावणे हाच विकास वाटतो. शिवसेनेला, महाविकास आघाडीला महाराष्ट्राची काळजी आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला अपयशी गुजरात मॉडेल दाखवू नये, मुंबईचा कारभार नीट करावा आणि हिंमत असेल तर सर्व निवडणुका लावा,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीची प्रशंसा विरोधकांना झोंबली
2017 पर्यंतचे दहा हजार मेट्रिक टन कचरा रोज गोळा होत होता. त्याचे विलगीकरण करून तो आम्ही साडेसहा टनावर आणला होता. आता ती घडी विस्कळीत झाल्याने कचरा कुठून येतोय हे कळतच नाही. अनेक गल्ल्यांमध्ये आठवडय़ाचा कचरा पडलेला असतो. या कचऱयापासून छोटे वीजनिर्मिती प्रकल्प उभारले जाऊ शकतात अशी सूचनाही त्यांनी मांडली. ‘डी’ विभागात उभारलेल्या तशा प्रकल्पाचे उदाहरणही त्यांनी दिले. त्यातून निर्मित ऊर्जेवर विजेचे दिवे लागतात आणि इलेक्ट्रिक वाहनेही चार्ज होतात, असे आदित्य ठाकरे यांनी सांगताच शिवसेनेची ती प्रशंसा विरोधकांना चांगलीच झोंबली.