गिरगाव चॅम्पियन्स लीगचा थरार, आदित्य ठाकरे यांची तुफान फटकेबाजी

आयपीएलचा धमाका सुरू असतानाच दक्षिण मुंबईतील क्रिकेटप्रेमींना ‘जीसीएल’ अर्थात ‘गिरगाव चॅम्पियन्स लीग’चा थरार अनुभवायला मिळणार आहे. शनिवारी या दोनदिवसीय टेनिस क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. पहिला सामना युवासेना कार्यकारिणी विरुद्ध डिजिटल मीडिया यांच्यात झाला. युवासेना संघाचे नेतृत्व शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या तुफान फटकेबाजीने सर्वांची वाहवा मिळवली.

दक्षिण मुंबईचे दिवंगत विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी पहिल्यांदा ही स्पर्धा आयोजित केली होती. यंदाही तितक्याच भव्यतेने युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ यांनी या स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी एमसीए अॅपेक्स कमिटीचे सचिव अभय हडप आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. पहिला सामना युवासेना कार्यकारिणी विरुद्ध डिजिटल मीडिया यांच्यात तर दुसरा सामना एम. सी. ए. अ‍ॅपेक्स कमिटी मेंबर विरुद्ध आयोजक कमिटी मेंबर असा रंगला. स्पर्धेची भव्य तयारी गिरगाव बॉईज आणि युवा व्हिजनच्या कार्यकर्त्यांनी केली. या स्पर्धेला टेनिस क्रिकेटमधील नामवंत खेळाडू, मुंबई संघाचे रणजीपटू यांची उपस्थिती असणार आहे. संपूर्ण स्पर्धेचे समालोचन चंदू शेटे करणार आहेत.

खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव

या वर्षी खेळाडूंवर बक्षिसांचा अक्षरशः वर्षाव होणार आहे. प्रत्येक ‘मॅन ऑफ द मॅच’ला एकूण 10 भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज यांनादेखील आकर्षक सन्मानचिन्ह, रोख रक्कम व भेटवस्तू देण्यात येणार आहेत. विजयी संघांमधील सर्व खेळाडूंना आकर्षक स्पोर्ट्स शूज देण्यात येतील.