‘पन्नास खोके, एकदम ओके’वाल्यांना आता ‘नॉट ओके’ करायचे आहे. भयमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र या, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. महाराष्ट्रात परिवर्तन होईल, गुंडागर्दी करणारे नाकर्ते सरकार तडीपार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नांदगाव तालुक्यातील निमगाव येथे महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत शुक्रवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारचा समाचार घेतला. नाकर्त्या खोके सरकारची राज्यात गुंडागर्दी सुरू आहे. जनतेत याविरुद्ध प्रचंड चीड असून, सर्वत्र ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा दिल्या जातात, आता यांना ‘नॉट ओके’ करायचे आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या भ्रष्टाचार, अनागोंदी कारभारामुळे महाराष्ट्राची जनता त्रस्त झाली आहे. राज्यातले मोठे उद्योग गुजरातला नेऊन पाच लाख तरुणांचा रोजगार त्यांनी हिसकावला आहे. महाराष्ट्रातले उद्योग आम्ही गुजरातमध्ये कसे आणले, याचा रोड शो तेथे केला जातो. चुकून यांचे सरकार पुन्हा आलेच तर हे महाराष्ट्रातले मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवतील, असा टोला आदित्य ठाकरे यांनी हाणला.
नांदगाव येथे गणेश धात्रक यांच्या प्रचारार्थ विराट सभा
नांदगावमध्ये रिंगणात असलेले मिंधे गटाचे सुहास कांदे आणि अपक्ष समीर भुजबळ यांचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी त्यांचा समाचार घेतला. येथे जनता भयभीत झाली आहे. मशालीलाच मतदान करायचंय, पण आपल्या घरी गुंड, गद्दार येतील का, याची भीती जनतेत आहे. पण एका व्यक्तीला जरी हात लावला तरी त्यांना आमचे सरकार आल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवू. बर्फाच्या लादीवर झोपवून मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱयांना दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती करून दिलासा दिला होता. महायुतीच्या सरकारने मात्र शेतकऱयांच्या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. अवकाळी पावसात शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकरी संकटात असताना कृषीमंत्री त्यांच्याकडे फिरकलेही नाहीत, असे सांगून कृषीमंत्री कोण आहेत, अशी विचारणा त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केली. कुठलाही प्रतिसाद येत नसल्याने जनतेला कृषीमंत्र्याचं नाव आठवत नाही इतके हे मंत्री निष्क्रिय आहेत, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार येईल तेव्हा शेतकऱयांचा हक्काचा माणूस, कुटुंबप्रमुख म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या सरकारमध्ये असतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
देशातल्या प्रत्येक नागरिकाला 2014 मध्ये भाजपा पंधरा लाख रुपये देणार होते, पंधरा लाखातले किती शून्य कमी झाले ते बघा, असे सांगून ते म्हणाले, पंधराशे रुपयांवर मताचा अधिकार कुणी विकत घेऊ शकत नाही. आमचे सरकार आल्यानंतर महिला सुरक्षेला आणि महिलांच्या सन्मानाला प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात सर्वत्र भ्रष्टाचार, गुंडागर्दी, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार यामुळे अंधार पसरला आहे, भयाचं वातावरण निर्माण केलं गेलंय. येत्या 20 तारखेला मशालीला मतदान करून हा अंधार दूर करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेना उपनेते सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, ग्रामीण जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, संतोष बळीद, संजय कटारिया, सुनील पाटील, माधव शेलार, राजाभाऊ करकाळे आदी उपस्थित होते.