इस्रोकडून आनंदाची बातमी; आदित्य एल-1 ची पहिली परिक्रमा पूर्ण

हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने एक आनंदाची बातमी दिली आहे. हिंदुस्थानातील पहिल्या सौर मोहिमेतील आदित्य-L1 अंतराळयानाने मंगळवारी सूर्य-पृथ्वी एल-1 बिंदूभोवती आपली पहिली परिक्रमा पूर्ण केली आहे. आदित्य एल ही सूर्याचा किंवा सौरमंडळातील घडामोडींचा अभ्यास करणारी हिंदुस्थानातील पहिली वेधशाळा आहे. गेल्या वर्षी 2 सप्टेंबर रोजी श्रीहरीकोटा येथून आदित्य एल-1 सूर्याच्या दिशेने प्रक्षेपित केले गेले.

या प्रभामंडळाच्या कक्षेत राहण्यासाठी 22 फेब्रुवारी आणि 7 जून रोजी असे अनुक्रमे दोन वेळा आदित्य एल-1 च्या मार्गात फेरबदल करण्यात आले. आजच्या तिसऱ्या फेरबदलासोबतच आदित्य-एल 1 मिशनसाठी यूआरएससी इस्रो येथे अत्याधुनिक उड्डाण विकसित मोबिलिटी सॉफ्टवेअर स्थापित करण्यात आले असल्याचेही इस्रोने नमूद केले आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य-एल 1 अंतराळयानाला एल 1 बिंदूभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 178 दिवस लागतात. या यानामध्ये सात पेलोड आहेत. या मिशनमागे इस्रोचे अनेक उद्देश आहेत. या मिशनद्वारे सौर मंडळातील हालचालींवर लक्ष्य ठेवून त्याचा बारकाईने अभ्यास करता येईल.