महायुतीत ठिणगी! रायगडात झेंडावंदन आदिती तटकरे करणार, गोगावले पुन्हा अस्वस्थ

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यातच महाराष्ट्र दिनी रायगडात झेंडावंदन करण्याचा मान आदिती तटकरे यांना देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाला धक्का दिल्याने मंत्री भरत गोगावले पुन्हा अस्वस्थ झाले आहेत. यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली असून गोगावले समर्थक आमदार महेंद्र दळवी यांनी या निर्णयास विरोध केला आहे.

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिंदे गट आग्रही आहे. रायगडसाठी भरत गोगावले, तर नाशिकसाठी दादा भुसे प्रयत्नशील होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजितदादा गटाच्या नेत्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची रायगडच्या, तर भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदीरी सोपवली होती. यामुळे महायुतीत जोरदार वाद होऊन नाराजीनाटय़ रंगल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर फडणवीस यांनी या दोन जिह्यांतील पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे.

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदे गट अडून बसला आहे. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आपली मुलगी आदिती तटकरे हिलाच रायगडचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी आग्रही आहेत. यासंदर्भात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या दोन-तीन बैठकाही झाल्या, परंतु त्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांच्याकडे झेंडावंदनाची जबाबदारी सोपवून शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे.

झेंडावंदनाचा अधिकार म्हणजे पालकमंत्रीपद दिले असे नाही – गोगावले

झेंडावंदनाचा अधिकार दिला म्हणजे पालकमंत्रीपद दिले अशातला भाग नाहीये. मागच्या वेळी पण 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला पण दिले होते, म्हणून कदाचित यावेळीही दिले असावे. मी अजून तलवार म्यान केली नाही, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

गोगावले समर्थक नाराज

महाराष्ट्र दिनी आदिती तटकरे यांनाच पुन्हा झेंडावंदनाची संधी देण्यात आल्याने मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक नाराज झाले आहेत. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी म्हणाले, गोगावले यांनाच जिह्याचे पालकमंत्रीपद मिळाले पाहिजे. आदिती तटकरे यांना झेंडावंदनाचा मान देणे योग्य नाही. यासंदर्भात रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन 1 मेच्या कार्यक्रमास विरोध केला जाईल असे त्यांनी सांगितले.