
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिन्याला देण्याची घोषणा केली होती. महायुतीचे सरकार येऊन आता जवळपास 2-3 महिन्यांचा काळ उलटला तरी त्याबद्दल अद्यापही निर्णय झालेला नाही. तसेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. अशातच महायुती सरकारने आश्वासन दिलेले 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हाच प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनीही विधान परिषदेमध्ये उपस्थित केला. या प्रश्नाला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर दिले. येत्या अधिवेशनाच्या काळात किंवा अर्थसंकल्पात 2100 रुपये देण्याची घोषणा करू असे कुठलेही वक्तव्य करण्यात आले नव्हते, असे त्या म्हणाल्या. यामुळे सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूकच केल्याचे दिसून येत आहे.
लाडक्या बहिणांना 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीने जाहीरनाम्यात दिले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पावेळी अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊन असे म्हटले होते. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट नाही तर पटापट 2100 रुपये टाकू असे विधान केले होते. मात्र सरकार आल्यानंतरही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. हाच प्रश्न अॅड. अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला.
याला उत्तर देताना अदिती तटकरे म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशनाच्या काळात किंवा अर्थसंकल्पात 2100 रुपये रक्कम करू अशा पद्धतीचे वक्तव्य कुठेही केलेले नाही. राज्याची योजना सरकारकडून जाहीर केली जाते आणि जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. योग्य पद्धतीने त्या संदर्भातील प्रस्ताव विभाग म्हणून शासन, मुख्यमंत्री, मंत्रीमंडळ सूचिक करेल त्यावेळी तसा प्रस्ताव शासनापुढे ठेऊ.
अदिती तटकरे आधी काय म्हणाल्या होत्या?
अदिती तटकरे यांना 2100 रुपयांबाबत आधी विचारण्यात आले असता त्या म्हणाल्या होत्या की, ‘आम्ही जेव्हा ही योजना जाहीर केली, त्यावेळी सुद्धा ती योजना अर्थसंकल्पात आणली होती आणि तिथून ती सुरू झाली होती. त्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळी येईल, ज्यावेळी अर्थसंकल्प तयार केला जाईल. त्यासंदर्भातील सकारात्मक निर्णय त्यावेळी निश्चितपणे घेतला जाईल.’ पण आता मात्र असे कुठलेही विधान करण्यात आले नव्हते असे त्या म्हणत आहेत. यामुळे यंदाच्या वर्षी लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.