मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटनांचे सत्र पुन्हा सुरु झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मणिपूरमध्ये केंद्रीय निमलष्करी दलाच्या अतिरिक्त 2500 जवानांचा फौजफाटा पाठवला आहे. यातील बहुतांश जवानांना जिरीबाममध्ये तैनात केले आहे. हिंसाचारात 7 नोव्हेंबरपासून 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
आठवडाभरापूर्वी मणिपूरच्या एका गावावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि सहा घरांना आगी लावत अंदाधुंद गोळीबारही केला होता. त्याचदरम्यान एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिला जाळून दिले होते. ती महिला तीन मुलांची माता होती. तिच्या हत्येनंतर परिस्थिती आणखी हिंसक बनली आहे.
मागील 19 महिन्यांत राज्यात मोठ्या प्रमाणावर रक्तपात घडला आहे. हिंसाचार रोखण्याचे मोठे आव्हान सुरक्षा दलांपुढे आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) 218 तुकड्या तैनात केल्या आहेत. त्यात एकूण 29,000 हून अधिक जवान आहे. त्याव्यतिरिक्तलष्कर आणि आसाम रायफल्सचे वेगळे सुरक्षा कवच ठेवले आहे.
जिरीबाम जिल्ह्यात 11 नोव्हेंबरला सुरक्षा दलांनी जाकुराडोंग करोंग येथे दहा कुकी दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांनी दोन सुरक्षा चौक्यांवर हल्ला केल्यानंतर सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना ठार केले होते. तेव्हापासून बेपत्ता असलेल्या तीन महिला आणि तीन मुलांपैकी दोघांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले आहेत.