अदानींच्या लाचखोरीचा हिंदुस्थानातही तपास व्हावा; सर्वेच्च न्यायालयात याचिका दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘लाडका उद्योजक’ गौतम अदानी यांच्या अडचणीत नवीन भर पडली आहे. अदानी यांच्या लाचखोरीचा अमेरिकेत पर्दाफाश झाला आहे. त्या गंभीर आरोपांचा सखोल तपास करण्याचे निर्देश हिंदुस्थानातील तपास यंत्रणांना द्या, अशी विनंती करणारी याचिका सर्वेच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

गौतम अदानींनी हिंदुस्थानात सोलर एनर्जीचा प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली अमेरिकेतील गुंतवणूकदारांकडून 25 हजार कोटी रुपये जमवले. तसेच सोलर एनर्जीचे कंत्राट मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱयांना 2 हजार 236 कोटींची लाच दिली. अमेरिकेतील सिक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशनने हा गंभीर आरोप केल्यानंतर न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानीविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे अदानी उद्योग समूहाला मोठा हादरा बसला आहे. याचदरम्यान सर्वेच्च न्यायालयात अॅड. विशाल तिवारी यांनी नवीन अर्ज दाखल केला आहे. अदानी उद्योग समूहाच्या लाचखोरीची हिंदुस्थानातील तपास यंत्रणांमार्फत कसून चौकशी करण्यासाठी निर्देश द्या, अशी विनंती अॅड. तिवारी यांनी सर्वेच्च न्यायालयाला केली आहे.