अदानींच्या दिघी पोर्टचा भूमिपुत्रांवर अन्यायाचा वरवंटा

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी-अदानी पोर्टमध्ये काम करणाऱ्या भूमिपुत्रांवर अदानी समूहाच्या व्यवस्थापनाने अन्यायाचा वरवंटा फिरवला आहे. या पोर्टने चालू आर्थिक वर्षामध्ये 400 मिलियन मेट्रिक टनचे लक्ष्य पूर्ण केले. त्यामुळे अदानी समूहाने विविध ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना दोन बेसिक पगार देऊन त्यांचा गौरव केला. मात्र सन्मानातून व्यवस्थापनाने भूमिपुत्र कामगारांना डावलले. हा पक्षपातीपणा उघडकीस आल्यानंतर भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उसळली असून कामगारांनी काळ्या फिती बांधून या प्रकाराचा निषेध केला आहे.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील दिघी पोर्ट हे बंदर अदानी समूहाने एनसीएलटीकडून 15 फेब्रुवारी 2021 रोजी ताब्यात घेतले. त्यावेळी दिघी पोर्टमध्ये काम करणाऱ्या सुमारे दीडशे कामगारांचेही हस्तांतरण झाले. तेव्हापासून अदानी समूहाचे व्यवस्थापन स्थानिक कामगारांवर अन्याय करीत आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये 400 मिलियन मेट्रिक टनचे लक्ष्य गाठल्यानंतर अदानी समूहाने विविध ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांना दोन बेसिक पगार दिले, परंतु दिघी पोर्टमधील 2009 पासून काम करणारे श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, तालुक्यामधील सर्वच स्थानिक कामगारांना या लाभापासून वंचित ठेवले आहे. अदानी समूहाच्या दिघी पोर्टमध्ये ठेकेदारी पद्धतीने एक महिन्यापासून काम करीत असलेल्या कामगारांनाही दोन बेसिक पगार देण्यात आले आहेत. हा सन्मान करताना व्यवस्थापनाने स्थानिक कामगारांचा थांगपत्ताही लागू दिला नाही. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भूमिपुत्र कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली. पूर्वीच्या कंपनीतून हस्तांतरण झालेल्या कामगारांनी पैकी जवळपास 20 कामगार सेवानिवृत्त झाले आहे. आता फक्त 130 कामगार या बंदरात काम करीत आहेत. अदानी व्यवस्थापनाकडून सुरू असलेल्या या पक्षपातीपणाचा कामगारांनी काळ्या फिती बांधून निषेध केला आहे.

व्यवस्थापनाची मग्रुरी

दिघी पोर्टमध्ये काम करणाऱ्या भूमिपुत्र कामगारांची होत असलेली पिळवणूक थांबवण्यात यावी, यासाठी जनरल मजदूर सभा युनियनचे संजय वढावकर यांनी व्यवस्थापनाबरोबर वारंवार बैठका घेतल्या. प्रत्येक वेळी व्यवस्थापनाने फक्त उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली. दिघी पोर्टमधील अदानी मॅनेजमेंट, युनियन आणि युनियनच्या कमिटी मेंबर्स यांच्यामध्ये वारंवार बैठका घेऊनसुद्धा हा विषय अद्याप मार्गी लागलेला नाही. व्यवस्थापनाने दाखवलेल्या या मग्युरीमुळे कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.