अदानी-भाजपचे काय संबंध आहेत? अखिर यह रिश्ता क्या कहलाता है? काँग्रेस नेत्याचा सवाल

नवीनच ऐकतोय की लाचखोरी भ्रष्टाचारात येत नाही. हे हास्यास्पद आहे. गौतम अदानी आणि सागर अदानी मालक असलेल्या कंपनीने लाच दिली. ती अदानींनी नाही तर अधिकाऱ्यांनी दिली सांगतात. म्हणजेच तुम्ही स्वीकारलं आहे. एक प्रकारे लाच दिल्याचे अदानींच्या कंपनीने स्वीकारलेच आहे, असा जोरदार टोला काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी लगावला आहे.

अधिकाऱ्यांनी लाच दिली आहे तर ती अदानींच्या कंपनीसाठीच दिली आहे. गौतम अदानी, सागर अदानी आणि त्यांच्या कुटुंबातील दोनजण हे थेट आरोपांपासून कसे काय वाचू शकतात? अशा आरोपांवर दिलं जात असलेलं स्पष्टीकरणही निव्वळ हास्यस्पद आहे. अदानी पहिल्यांदा बोललेत आणि भाजपने आपले घोडे उधळलेत. असं वाटतंय अदानींनी नाही तर भाजपने लाच दिली आहे का? अखिर यह रिश्ता क्या कहलाता है?, असा सवाल काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी केला आहे.

‘भाजपने एकनाथ शिंदेंनाही रस्त्यावर आणलं’

भाजपा ही मुळातच धोकेबाज पार्टी आहे. ज्या पक्षासोबत समझौता करते, त्या पक्षाला फोडते आणि तो गिळून टाकते. मग अकाली दल असो, काश्मीरमध्ये जे केलं ते आणि आता महाराष्ट्र. प्रत्येक ठिकाणी ते कुटुंब फोडतात, पक्ष फोडतात आणि संपवून टाकतात. महाराष्ट्रात हेच सुरू आहे. एकनाथ शिंदे यांचा भाजपने भरपूर वापर केला. शिंदे मुख्यमंत्री होणार नसतील तर हे स्पष्ट आहे की, शिवसेनेशी असलेली दुश्मनी त्यांनी निभावली. बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला आणि आता शिंदेंनाही रस्त्यावर आणलं आहे, अशी टीका प्रमोद तिवारी यांनी केली.