अदानी समूहाकडून करण्यात येणाऱया धारावीच्या पुनर्विकासाला स्थानिकांचा विरोध आहे. असे असतानादेखील गुरुवार, 12 सप्टेंबर रोजी माटुंग्यातील आरपीएफ मैदानात धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. धारावी पुनर्विकासाची कोणतीही ब्लूप्रिंट जाहीर न करता भूमिपूजनाचा घाट घालणाऱया अदानी समूहाविरोधात धारावी बचाव आंदोलन समिती चांगलीच आक्रमक झाली असून भूमिपूजन उधळून टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निषेध आंदोलनामुळे अदानीविरोधातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
धारावी पुनर्वसनासाठी माटुंग्यातील आरपीएफ मैदानात 12 सप्टेंबर रोजी भूमिपूजन करण्याची घोषणा डीआरपीपीएलने केली. या घोषणेमुळे धारावीकर संतापले आहेत. धारावीकरांच्या मागणीबाबत कोणताही विकास आराखडा जाहीर नसताना डीआरपीपीएल पंपनी धारावी पुनर्वसनाचे भूमिपूजन कसे काय करू शकते, असा सवाल धारावीकरांनी उपस्थित केला आहे. याबाबत धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक माजी आमदार बाबूराव माने म्हणाले, धारावी बचाव आंदोलनाने केलेल्या मागण्यांबाबत डीआरपीपीएल आपले चित्र स्पष्ट करत नाही तोपर्यंत धारावी पुनर्वसनाचे भूमिपूजन ते कसे काय करू शकतात? ही निव्वळ फसवेगिरी सुरू झाली असून मोकळय़ा जागेत इमारती बांधून एखाद्या गावठाणासारखा धारावीचा विकास ते करू पाहत आहेत. या जागेत उंचच उंच टॉवर बांधून धारावीकरांना आपल्या मोहपाशात अडकविण्याचा डाव डीआरपीपीएलने सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.
आजपासून साखळी उपोषण
धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक व कार्यकर्ते 11 सप्टेंबला भूमिपूजनाच्या जागेपासून हाकेच्या अंतरावर साखळी उपोषणाला बसतील, अशी माहिती बाबूराव माने यांनी दिली. साखळी उपोषणात शेकापचे नेते राजेंद्र कोरडे, साम्या कोरडे, भाकप नेते नसीरुल हक, राष्ट्रवादीचे नेते उल्लेश गजाकोश, काँग्रेसचे सुभाष पाखरे, वंचित नेते अनिल कासारे, सपा नेते अशफाक खान, बसपा नेते श्यामलाल जैस्वाल, ‘आप’चे नेते अॅड. संदीप कटके, पॉल राफेल, अयुब खान, सीपीआयएम नेते, शैलेंद्र कांबळे, एम. ऍश सेल्वन, समन्वयक संजय भालेराव, शिवसेना पदाधिकारी साईनाथ, विभागप्रमुख महेश सावंत, धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार आणि ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश सावंत, धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने बिझनेसमन असोसिएशनचे अबू खालिद अंजुम, तंजीम-ए-इन्साफचे इस्तियाक अहमद नूरी, अब्दुल्ला शेख, एआयवायएफचे हसन पठाण सहभागी होणार आहेत. तर 12 सप्टेंबर रोजी होणाऱया निषेध आंदोलनात शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.