पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीत दुसरी बीकेसी उभारण्याचे स्वप्न पाहणाऱया अदानीने आता बीकेसीतदेखील हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी आम्हाला जागेची आवश्यकता असून बीकेसीतील एमएमआरडीएच्या ताब्यात असलेली 15 एकर जागा द्यावी, अशी मागणी अदानीच्या धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) या विशेष हेतू पंपनीमार्फत करण्यात आली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली अदानीचा डोळा आता बीकेसीतील एमएमआरडीएच्या भूखंडावर असल्याचे दिसत आहे. डीआरपीपीएलच्या मागणीनंतर डीआरपीने एमएमआरडीएला पत्र पाठवून 5 वर्षे भाडेतत्त्वावर या जागेची मागणी केली आहे.
डीआरपीने पत्रात काय म्हटलेय
बीकेसी जी ब्लॉक येथील जमीन पूर्वी विविध पंपन्यांद्वारे कास्टिंग यार्डसाठी वापरली गेली आहे. या जमिनीचा सुमारे 15 एकर भाग एमएमआरडीएकडे उपलब्ध आहे. सदर जागेचा वापर बांधकामासाठी लागणारी मशिनरी, मोठी वाहने हालवण्यासाठी तसेच वापरासाठी आवश्यक आहे. या जागेची सध्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला अत्यंत आवश्यकता आहे, असे डीआरपीने एमएमआरडीएला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.