चार महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या जोरदार दणक्यानंतर ‘बेस्ट’ प्रशासनाने निवासी वीज ग्राहकाला ‘अदानी’चे स्मार्ट वीज मीटर बसवण्यास स्थगिती दिली होती. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता राज्यात येताच बेस्टच्या स्थगितीला न जुमानता अदानीचे कंत्राटदार चुनाभट्टीपासून कुलाब्यापर्यंत खुलेआम स्मार्ट मीटर बसवत आहेत. याचा फटका बेस्टच्या 11 लाख ग्राहकांना बसणार आहे. बेस्टने याची दखल घेऊन अदानीचे स्मार्ट मीटर बसवणे तत्काळ थांबवण्याचे आदेश द्यावेत, नाहीतर शिवसेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा माजी आमदार दगडू सकपाळ यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांना दिला आहे.
बेस्टने वीज मीटरच्या अद्ययावतीकरणाचे कारण देत वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर देण्यास सुरुवात केली होती. यामध्ये सुमारे 11 लाख वीजग्राहकांपैकी तीन लाख ग्राहकांना नवीन स्मार्ट वीज मीटर बसवण्यातही आले आहेत. याविरोधात 5 ऑगस्टला बेस्टच्या सर्व संबंधित अधिकारी वर्गाबरोबर बेस्ट परिवहन भवन येथे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बैठक घेतली. या बैठकीत बेस्टच्या निवासी ग्राहकांना अदानी पंपनीचे नवीन स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत, असे बेस्ट अधिकाऱयांनी स्पष्ट केले तसेच नंतर लेखी स्वरूपात याबाबत माहिती देण्यात आली. मात्र, आता पुन्हा अदानीचे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू झाले आहे.
बेस्ट संपवण्याचा डाव
मुंबईतील बेस्ट ग्राहकाला कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे वीज मीटर बदलण्याचे काम सक्तीने सुरू आहे. स्मार्ट मीटरमुळे नाहक आर्थिक भुर्दंड पडत असल्यामुळे वीज ग्राहकांचा याला विरोध आहे. नवीन मीटरमुळे वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलाला सामोरे जावे लागत आहे. नव्या मीटरमुळे बेस्टचे मीटर वाचक, वीज वितरण कर्मचारी आणि रोख भरणा करणारे असे विविध खात्यातील कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. अशा प्रकारे बेस्ट अदानीच्या हाती सोपवून बेस्टला संपवण्याचा हा डाव आहे. मात्र, हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे दगडू सकपाळ म्हणाले.