Paris Olympics 2024 – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा शिरकाव, पदक विजेता खेळाडू बाधित

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आता कोरोनाची एन्ट्री झाली आहे. ब्रिटेनचा जलतरणपटू एडम पीटी याला कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच त्याने 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक इव्हेंटमध्ये रौप्य पदक जिंकले होते. 28 जुलै रोजी त्याने पदक जिंकले आणि दुसऱ्याच दिवशी तो कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. अमेरीकेच्या निक फिंक सोबत तो एका पत्रकार परिषदेत हजर होता. तो सुवर्णपदक जिंकलेल्या इटलीच्या निकोलो मार्टिनेंगीसोबत संपर्कात आला होता. त्यामुळे नेमका किती जणांच्या संपर्कात आला याबाबत तपासणी सुरू आहे.

ब्रिटीश अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एडमला रविवारी अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. मात्र त्यानंतरही तो अंतिम फेरित सहभागी झाला. अन्य खेळाडूंसोबतही तो गप्पा मारताना दिसला. मात्र अंतिम सामन्यानंतर त्याची तब्येत जास्त बिघडली आणि सोमवारी सकाळी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आता आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचे अमेरीकेच्या जलतरण संघाने म्हटले आहे. मात्र फिंकची टेस्ट केली की नाही? याबाबत माहिती मिळालेली नाही.