… तर विराट असेल हिंदुस्थानचा कसोटी कर्णधार, ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज गिलख्रिस्टचा अंदाज

ऑस्ट्रेलियातील दारुण पराभवानंतर हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व कुणाच्या खांद्यावर असेल, याची चिंता हिंदुस्थानी संघव्यवस्थापन, माजी कसोटीपटूंनाच नव्हे तर जगभरातील दिग्गज खेळाडूंना सतावू लागली आहे. हिंदुस्थानचे नेतृत्व जसप्रीत बुमराकडे सोपवणे चिंताजनक असल्याचे सांगत विराट कोहलीने पुन्हा नेतृत्व स्वीकारण्यास होकार दर्शविला तर त्याची निवड झाली तर मला आश्चर्य वाटणार नसल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने व्यक्त केलेय.

ऑस्ट्रेलियाच्या अपयशाने हिंदुस्थानी संघाची चिंता आणखी वाढवलीय. आगामी काळात हिंदुस्थानचे नेतृत्व कुणाकडे सोपवावे यासाठी आतापासूनच बीसीसीआयचा काथ्याकूट सुरू झाला आहे. यात अनेक नावे समोर येऊ लागली आहेत. काहींच्या मते बुमराच भावी कर्णधार आहे तर काहींना त्याच्यावर ही जबाबदारी सोपवणे धोकादायक वाटतेय. काही माजी क्रिकेटपटू नव्या दमाच्या ऋषभ पंत आणि शुभमन गिलचाही पर्याय असल्याचे सांगत आहेत. मात्र गिलख्रिस्टचे मत भिन्न आहे. त्याच्यानूसार रोहित आगामी कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जाणार नाही. तो आता पुन्हा कसोटी क्रिकेट खेळेल असे वाटत नाही. मात्र तो आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी नक्कीच खेळेल. त्यानंतर तो कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर करेल. बुमराला दोन कसोटी सामन्यांत हिंदुस्थानचे नेतृत्व सांभाळण्याची संधी लाभली. तो कर्णधारपदाचा नंबर वन दावेदार आहे. मात्र संघ व्यवस्थापन त्याच्याबाबत चिंतीत आहे. आधीच त्याच्यावर गोलंदाजीचा दबाव असतो. तसेच गोलंदाज म्हटला की दुखापती आल्याच. अशा स्थितीत संघव्यवस्थापनाला आणखी आव्हानांनाही सामोरे जावे लागण्याची तयारी करावी लागेल. त्यामुळे बुमरा नेतृत्व सांभाळण्यास किती सक्षम असेल, याचा नक्कीच विचार करावा लागेल. त्यामुळे हिंदुस्थानी संघाचे नेतृत्वाचा खरा दावेदार कोण असेल हे सांगणे निश्चितच कठीण आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व विराटकडेही पुन्हा जाऊ शकते. याचे मला जराही आश्चर्य वाटणार नाही. जर तो ते स्वीकारण्यास तयार असेल तर तोच भावी कर्णधार असेल, असेही मत गिलख्रिस्टने बोलून दाखवले.