ऍड. राहुल झावरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर खासदार नीलेश लंके यांनी नगर येथे रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. झावरे यांचा जबाब घेतल्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करतील, कार्यकर्ते आणि जनतेने शांतता राखावी, असे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले.
पारनेर येथे हल्ला झाल्यानंतर ऍड. राहुल झावरे यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, योगीराज गाडे यांनी झावरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
खासदार लंके म्हणाले, मारहाणीत झावरे यांच्या डोके व पोटाला मार लागलेला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पारनेर येथील गुंडांनी हा हल्ला केला असून, पोलिसांना त्यांची नावे माहीत आहेत. ज्या गुंडांनी मारहाण केली त्यांची या अगोदरची भाषणे पहा, आम्हाला कोणीच काही करू शकत नाही, असे ते बोलत होते. मारहाण करणाऱयांवर आधीच गुन्हे दाखल आहेत. जमीन बळकावण्याचे, अधिकाऱयांना मारहाण केल्याचे गुन्हे दाखल आहेत, असे लंके म्हणाले. दरम्यान, याबाबत झावरे यांचा जबाब घेतल्यानंतर गुन्हा दाखल होईल. जनता आणि कार्यकर्त्यांनी संयम राखावा, शांतता राखावी, असे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले.