दर्जेदार लेखकांच्या साहित्याने नटलेल्या ‘कालनिर्णय’च्या दिवाळी अंकाचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले. ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी’चे यंदाचे 32वे वर्ष आहे. निसर्ग, मनोरंजन, इतिहास, साहित्य तसेच विविध विषयांवरील वाचनीय लेख हे अंकाचे वैशिष्ट्य आहे.
पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांनी ‘आपत्तींची उत्क्रांती’ लेखातून हवामान बदल, निसर्गविनाश आणि त्यातून होणारा पृथ्वीचा विध्वंस या समस्येकडे लक्ष वेधले आहे. सुनील लिमये यांचे मेळघाट अभयारण्यातील गूढ वातावरणाचे अनुभव तर ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांचे न्यूयॉर्कचे संपादक रॉबर्ट सिल्वर्स यांचे कारकीर्द मांडली आहे. मधुकरी धर्मापुरीकर यांनी ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेमवेल यांच्यावर लेख लिहिला आहे.
डॉ. प्रकाश खांडगे यांनी बैठकीची लावणी सादर करणाऱ्या कलावंत यमुनाबाई वाईकर यांची ओळख करून दिली. मुरली रंगनाथन लिखित ‘तिबेटमधील मुद्रणतंत्राचा सुवर्ण इतिहास’ वाचकांसमोर मांडलाय, तर जयश्री हरी जोशी यांनी जर्मनीतील बुद्धिवंतांच्या प्रतिभावान सर्जनशक्तीचा आढावा घेतला. याशिवाय अमरेंद्र धनेश्वर, विनय सायनेकर, पंकज भोसले यांचे लेख आहेत. लघुकथा स्पर्धेत निवड झालेल्या 13 कथा तसेच पाकनिर्णय स्पर्धेतील परीक्षकांचे अनुभव आणि उत्तेजनार्थ पाककृती, व्यंगचित्रे, राशीभविष्य अंकात आहे. जयराज साळगावकर ‘कालनिर्णय सांस्कृतिक’चे संपादक आहेत.