“बसप्रवासात मागून एक हात आला अन्…”, सई ताम्हणकरने सांगितला अंगावर काटा येणारा प्रसंग

सई ताम्हणकर हिला ओळखत नाही असा एकही चित्रपटवेडा उभ्या महाराष्ट्रात सापडणार नाही. गेल्या दीड दशकांहून अधिक काळापासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय असणाऱ्या सईने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. विविधांगी भूमिकांसह ती स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. नुकत्याच एका मुलाखतीत तिने स्ट्रगल काळात आपल्यासोबत घडलेला एक अंगावर काटा येणारा प्रसंग सांगितला आहे.

चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले तेव्हा सई ताम्हणकर सांगली ते मुंबई असा बसप्रवास करायची. या प्रवासादरम्यान तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग तिने ‘हॉटर फ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. रस्त्यावर चालताना तुला काही वाईट अनुभव आले आहेत का? असे विचारले असता सईने बसमधील एक प्रसंग सांगितला.

सई म्हणाली की, सुरुवातीला काम करण्यास सुरुवात केली तेव्हा मी सांगली ते मुंबई बसने प्रवास करायची. रात्री सांगलीतून बसायचे आणि सकाळी मुंबईत उतरायचे. एकदा बसने प्रवास करत असताना माझ्या मागच्या सीटवर एक मुलगा बसला होता. मागच्या सीटवरून एक हात आला आणि त्याने मला दंडाजवळ पकडले. आधी मी घाबरले, मग त्याचा हात पकडला, जोरात ओढला आणि पिरगाळला. त्यानंतर त्याला म्हटलं, भावा परत हा हात इकडे आला तर मोडून टाकेल. मी कोणाला घाबरत नाही.

दरम्यान, यावेळी मुंबई हे शहर महिलांसाठी सुरक्षित असल्याचेही सई म्हणाली. मुंबई खूप चांगले शहर आहे. तुम्ही रात्री प्रवास करत असाल आणि तुमच्यासोबत काही घडले तर लोकं मदतीला येतात. ते व्हिडीओ चित्रित करत नाहीत, तर खरोखर मदतीला येतात. मी लोकांना मदत करताना पाहिले आहे, असेही सई म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivaji Storm Sen (@stormshivajisen)

कास्टिंग काऊचबाबत विचारले असता सईने एक जुना किस्सा सांगितला. मला एक फोन आला होता. अशी अशी भूमिका असून तुला या या लोकांसोबत झोपावे लागेल. त्यावर मी हे तू तुझ्या आईला सांग, असे सुनावल्याचे सईने सांगितले. 15-16 वर्षाच्या कारकिर्दीत एकदाच असा किस्सा घडल्याचे तिने सांगितले.