अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा भाऊ अमन प्रीत सिंग याला हैदराबादमध्ये कोकेनचे सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अमनसोबत इतर चार जणांना देखील अटक झाली आहे.
तेलंगणा अँटी नार्कोटिक्स ब्युरो, सायबराबाद पोलिसांनी स्पेशल ऑपरेशन्स टीम आणि राजेंद्रनगर पोलिसांनी शहरातील हायप्रोफाइल ड्रग डिलर्सची माहिती मिळताच पोलिसांनी नरसिंगी येथील हैदरशाकोटला येथील एका खोलीवर छापा टाकला. या छाप्यामध्ये ग्राहकांना कोकेनची विक्री करताना दोन नायजेरियन लोकांसह पाच जणांना अटक केली.
या छाप्यामध्ये 35 लाख किमतीचे 199 ग्रॅम कोकेन, दोन पासपोर्ट, दोन दुचाकी, 10 सेल फोन आणि इतर साहित्य जप्त केल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली. यामध्ये 13 पैकी पाच जणांना अटक केल्यानंतर त्यांच्या लघवीचे नमुने तपासले असता पाचही जणांचा कोकेनचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये अमन सह अनिकेत, प्रसाद, मधु, आणि निखिल अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
यापूर्वी देखील रकुल प्रीत सिंगला अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवन प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने समन्स बजावले होते. 2022 आणि 2021 मध्ये देखील या संदर्भात तपास संस्थेने अभिनेत्रीचे जबाब नोंदवले होते.