
अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. राजेश्वरीने आज सोशल मीडियावर फोटो शेअर करून बाप्तिस्मा स्वीकारल्याचे सांगितले. यावरून राजेश्वरीला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. यानंतर ‘फँड्री’तल्या या शालूने शालजोडीतील मारत या ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला. 500 रुपयांत मत विकणाऱ्यांनी मला धर्म शिकवू नये, असे सडेतोड उत्तर तिने ट्रोलर्सला दिले.
राजेश्वरी खरातने आज इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिच्या धर्मांतराबद्दल सांगितले. ‘बाप्तिस्मा… नवीन सुरुवात, आयुष्य, प्रेम…’ अशी कॅप्शन तिने दिली. ख्रिश्चन धर्मीयांसोबतचे फोटोही तिने शेअर केले. त्यानंतर सोशल मीडियावर तिच्या धर्मांतराची चर्चा रंगली. अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या; पण त्याच वेळी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.
हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका तिच्यावर झाली. ‘तुमच्यापेक्षा गरीब लोक बरे जे स्वाभिमानी असतात. काळ्या चिमणीची राख टाकायला पाहिजे. शेवटी हा तुझा वैयक्तिक निर्णय आहे. तू असे करायला नको होतेस,’ अशा शब्दांत तिला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर ट्रोलर्सना प्रत्युत्तर देताना राजेश्वरीने एक पोस्ट लिहिली. त्यात तिने निवडणुकीमधील पैसे, किराणाने भरलेल्या पिशव्या यांचा उल्लेख करत हे लोक मला आज जात व धर्म शिकवायला आले, असे परखड वक्तव्य केले. माझा जन्म ख्रिश्चन कुटुंबातील आहे आणि मी सर्वांचा आदर करते, असा टोलाही तिने ट्रोलर्सना लगावला. राजेश्वरीच्या चित्रपट कारकिर्दीविषयी सांगायचे तर तिने ‘फँड्री’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात तिने ‘शालू’ ही भूमिका साकारली.
शालूचे शालजोडे
निवडणुका, प्रत्येकी 500 रुपये, किराणा भरून पिशव्या, दारू व हॉटेलला जेवण, आणि साहेब, दैवत, देव माणूस वगैरे… हे आज धर्म/जात शिकवायला आले आहेत, तुमचे स्वागत आहे. कोणी पैशांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात. माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे.
टीप ः माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्मांचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्वीकारली जावी एवढी विनंती.