टीव्ही इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सध्या दिव्यांका आणि विवेक इटलीमध्ये आहेत. इटलीमध्ये या जोडप्याला एका गंभीर गोष्टीला सामोरे जावे लागले आहे. दिव्यांका आणि विवेक यांच्या गाडीवर दरोडा पडला असून या दरोड्यामध्ये चोरट्यांनी त्यांचा पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, व तब्बल 10 लाखांचा ऐवज चोरला आहे.
दिव्यांका त्रिपाठी व तिचा पती विवेक दहिया हे जोडपे त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करण्यासाठी युरोप दौऱ्यावर गेले आहेत. दिव्यांका आणि विवेक इटली येथे फ्लॉरेन्समधील एका हॉटेल बूक करण्यासाठी थांबले होते. यावेळी त्यांनी गाडी पार्किंगमध्ये लावली होती. गाडीमध्ये त्यांचे सामान होते. हॉ़टेलमधील बूकिंग झाल्यानंतर सामान आणण्याकरीता ते पुन्हा गाडीकडे गेले. त्यावेळी त्यांना गाडी उघडी दिसली व त्यातील सामान चोरीला गेले होते. चोरीला गेलेल्या सामानामध्ये जोडप्याचा पासपोर्ट, पर्स आणि 10 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू होत्या. या घटनेनंतर जोडप्याने लगेचच स्थानिक पोलिसांकडे जाऊन तक्रार केली मात्र त्यांनी अहवाल नोंदवण्यास नकार दिला. सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याशिवाय ते काही कार्यवाई करु शकत नाहित असे पोलिसांनी सांगितले.
स्थानिक पोलिसांनी मदतीस नकार दिल्याने दिव्यांका आणि विवेकने दूतावासाची मदत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दूतावास देखील बंद असल्याने त्यांना मदत मिळाली नाही. यानंतर दिव्यांका आणि विवेकने इंस्टाग्रामवर घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गाडीची काच फोडलेली दिसत आहे. दिव्यांकाने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये विवेक आणि मी सुरक्षित आहोत. पण आमचा पासपोर्ट, महत्वाच्या आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. हिंदुस्थानी दूतावासाकडून मदतीची अपेक्षा आहे, असे तिने आपल्या स्टोरीमध्ये म्हटले आहे.