Rajinikanth health update – रजनीकांत यांची तब्येत बिघडली, चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल

सुपरस्टार रजनीकांत (वय – 73) यांची तब्येत बिघडली असून त्यांना उपचारांसाठी चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रख्यात कार्डिओलॉजिस्ट डॉ. साई सतीश यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना सोमवारी रात्री उशिरा चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रजनीकांत यांच्या पोटामध्ये वेदना होत असून मंगळवारी हृदयाशी संबंधित चाचण्या केल्या जाणार आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. रजनीकांत यांच्या कुटुंबीयांकडून किंवा रुग्णालयाकडून अद्याप याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

याआधी 2020 मध्ये रजनीकांत यांना उच्च रक्तदाब आणि थकवा या तक्रारींमुळे हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उच्च रक्तदाब स्थिर झाल्यानंतर 27 डिसेंबर रोजी त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना एक आठवडा विश्रांतीचा सल्ला दिला होता.

यादरम्यान, 22 डिसेंबर रोजी रजनीकांत यांची कोविड-19 चाचणीही करण्यात आली होती. ही चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरही खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले होते. तत्पूर्वी 2016 मध्ये त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.

दरम्यान, रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट वेट्टयान (Vettaiyan) 10 ऑक्टोबर रोजी देशभरातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. रजनीकांत यांचा हा 170 वा चित्रपट आहे. याआधी 73व्या वाढदिवशी या चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये रजनीकांत यांच्यासोबत महानायक अमिताभ बच्चन, फहस फासील, राणा दग्गुबाती, रितीका सिंह, मंजू वॉरियर आणि दुशआरा विजयन अशी कलाकारांची तगडी फौज आहे. या चित्रपटानंतर रजनीकांत यांचा ‘कुली’ (Coolie) हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होईल.