Breaking News – ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचे मुंबईत निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांनी देशभक्तीपर चित्रपटांसाठी केलेल्या अभिनयामुळे त्यांची ‘भारत कुमार’ अशी ओळख तयार झाली होती. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. 2015 साली त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

24 जुलै 1937 रोजी हरिकृष्ण गिरी गोस्वामी म्हणजेच मनोज कुमार यांचा जन्म झाला होता. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यावर त्यांना मनोजकुमार या नावाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी देशभक्तीपर चित्रपटांसाठी केलेल्या भूमिकांमुळे ते भारत कुमार या टोपणनावाने ओळखले जाऊ लागले.

मनोज कुमार यांनी “शहीद” (1965), “उपकार” (1967), “पूरब और पश्चिम” (1970), आणि “रोटी कपडा और मकान” (1974) यासह अनेक देशभक्तीपर विषय असलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल मनोज कुमार यांना 1992 मध्ये पद्मश्री आणि 2025 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

देशभक्तीपर चित्रपटांव्यतिरिक्त, त्यांनी “हरियाली और रास्ता”, “वो कौन थी”, “हिमालय की गोद में”, “दो बदन”, “पत्थर के सनम”, “नील कमल”, आणि “क्रांती” सारख्या इतर चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांचे चित्रपट देशभक्तीपर गीतांमुळेही लोकप्रिय झाले होते. त्यात जहाँ दाल दाल पर सोने की चिडीया करती है बसेरा, मेरे देश की धरती यासारख्या अनेक गीतांचा समावेश आहे.