
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच एका मुलाखतीत बोलताना त्याने बॉलिवूडमधील सत्य समोर आणले. चित्रपटसृष्टीत कमालीची नकारात्मकता पसरलेली असून इथे कोणीच कोणाचे नाही. बॉलिवूडमध्ये सहकार्याचा अभाव आहे. बरेच लोक एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात आणि इतरांच्या यशाला तितकेसे महत्त्व देत नाहीत.
इंडस्ट्री पूर्वीसारखी राहिली नाही असे आपण अनेकदा ऐकतो. हे सत्य असून एकमेकांना खाली खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे मला स्पष्टपणे जाणवते, असे इमरान हाश्मी म्हणाला. इमरानने पुढे म्हटले की, बॉलिवूडमध्ये एकमेकांना कमी लेखण्यामागे कोण आहे हे मी सांगू शकत नाही. पण हे घडते हे सत्य आहे. या क्षेत्रातील काही लोकांचे विचार फारच वाईट आहेत. त्यांच्या बोलण्यावरून हे जाणवते की, ते इतरांच्या यशाने खरोखर आनंदी नाहीत. एखादा चित्रपट गाजला तर ती आकडेवारी खोटी असल्याचे सांगितले जाते.