ट्रेडिंगच्या नावाखाली ठगाने अभिनेत्याला चुना लावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार हे अभिनेते आहेत. गेल्या आठवडय़ात त्यांना त्यांच्या मैत्रिणीने इंस्टाग्रामवर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्याने सहा लाख रुपये नफा झाल्याची एक पोस्ट शेअर केली होती. अभिनेत्यालादेखील नफा कमवायचा असल्याने त्याने त्याने एका आयडीवर मेसेज केला. त्यानंतर त्याना इंस्टाग्राम आयडीवर एक वेबसाईटची लिंक पाठवून माहिती भरण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्याने माहिती भरली. माहिती भरल्यावर त्याचे खाते उघड झाले. जर 20 हजार रुपये गुंतवणूक केल्यास 2 लाख रुपये मिळतील असे त्याना सांगण्यात आले.
तक्रारदार याना गुंतवणूक करायची असल्याने त्याने 20 हजार रुपयाच्या स्कीममध्ये पैसे गुंतवायचे असल्याचे सांगितले. तेव्हा ती 20 हजार रुपयांची स्कीम बंद झाल्याचे त्याना सांगण्यात आले. त्याने 40 हजार रुपये गुंतवले. त्यांना पोर्टलवर साडेचार लाख रुपये नफा जमल्याचे दिसले. महिलेने अभिनेत्याला तुमचे खाते अपग्रेड करावे लागेल, त्यासाठी आणखी 40 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्याने पैसे पाठवले. पैसे पाठवल्यावर आणखी 40 हजार रुपयांची मागणी केली. ते पैसेदेखील त्याने ऑनलाइन पाठवले. खात्यात त्यांना पाच लाख 30 हजार रुपये नफा दिसत होता. तेव्हा अभिनेत्याने ते पैसे काढायचे असल्याचे सांगितले. महिलेने पैसे काढण्यासाठी विड्रॉल पिन तयार करायला लागेल अशा भूलथापा मारल्या. विड्रॉल पिन आणि माइनिंग शुल्काच्या नावाखाली पैसे उकळले. पैसे पाठवल्यानंतर ती आणखी पैशाची मागणी करू लागली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अभिनेत्याने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली.