
डॉ. विलास उजवणे (61) यांचे शुक्रवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’, ‘वादळवाट’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. गेल्या काही दिवसांपासून बोरिवली येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, डॉ. विलास उजवणे यांच्या निधनामुळे एका हरहुन्नरी कलाकाराची एक्झिट झाली, अशी हळहळ कलाकारांनी व्यक्त केली.
काही वर्षांपूर्वी डॉ. विलास उजवणे यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. आजारपणामुळे त्यांना आर्थिक अडचणींचादेखील सामना करावा लागला. त्यांचा मित्रपरिवार आणि चाहत्यांनी त्यांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केले होते.आजारपणावर मात केल्यानंतर ‘पुलस्वामिनी’ या चित्रपटातून ते पुन्हा अभिनयाकडे वळले. आगामी काळात त्यांचे ‘26 नोव्हेंबर’, ‘आभाळ’ आणि ‘सोरट’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. जानेवारीतच त्यांनी अभिजीत वारंग दिग्दर्शित ‘सोरट’ या चित्रपटासाठी शूटिंग केले होते. या चित्रपटात ते वडिलांच्या भूमिकेत आहेत.
डॉ. विलास उजवणे यांचा जन्म 16 डिसेंबर 1964 साली नागपुरात झाला. शालेय जीवनापासून त्यांना अभिनयाची आवड होती. ‘अन्यायाला फुटती शिंग’ या बालनाटय़ातून त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. आपली अभिनयाची आवड जपून त्यांनी गव्हर्नमेंट आयुर्वेदिक काॅलेजमधून वैद्यकीय पदवी घेतली. ‘चाणक्य’ ही त्यांची पहिली मालिका होती. ‘नाती अनोळखी’ या नाटकातील भूमिकेमुळे त्यांना ओळख मिळाली. ‘जनता जनार्दन’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
‘चित्रकर्मी’ पुरस्काराने गौरव
डॉ. विलास उजवणे यांनी आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीत त्यांनी 110 हून अधिक चित्रपट, 67 नाटक आणि तब्बल 140 मालिकांमध्ये काम केले होते. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या कारकीर्दीची दखल घेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्यांना ‘चित्रकर्मी’ या पुरस्काराने सन्मानित केले होते.