
संवेदनशील अभिनेते, लेखक-कवी अतुल कुलकर्णी अनेकदा सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरील परखड आणि स्पष्ट भाष्य करतात. आजही त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपली भावना व्यक्त केली. ‘चांगल्या भविष्याची खात्री देता येत नसली की अप्रासंगिक भूतकाळ खोदायला प्रवृत्त केलं जातं,’ अशी फेसबुक पोस्ट अतुल कुलकर्णी यांनी लिहिलेय. सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू असताना अतुल कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतलेय.
अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर भलेभले कलाकार गप्प बसणे पसंत करतात. अतुल कुलकर्णी मात्र याला अपवाद आहेत. ते स्पष्टवक्तेपणा दाखवत आपली भूमिका मांडतात. सध्या महाराष्ट्रात जी अराजकता सुरू आहे त्यावर त्यांनी थेट भाष्य केलंय. त्यांच्या पोस्टवर लाईकचा वर्षाव पडत असून अनेक जण पोस्ट शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘लोक मताची डुबकी’ ही कविता लिहिली होती. कवितेच्या माध्यमातून त्यांनी मतांच्या राजकारणावर आणि लोकांच्या मानसिकतेवर नेमकेपणाने बोट ठेवले होते.