
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या जगात पाऊल ठेवले आहे. त्यामुळे लाडक्या अशोक मामांविषयी अनेक घडामोडी चाहत्यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पाहायला मिळतील. इन्स्टावर अकाऊंट उघडल्याची माहिती त्यांनी चाहत्यांना स्वतःच दिली आहे. ashoksaraf_Official असे त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलचे नाव असून हे त्यांचे अधिकृत अकाऊंट आहे.
या नवीन अकाऊंटवरूनच अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘अशी ही जमवाजमवी’ या नव्या चित्रपटाचा टीझरही टाकला आहे. अशोक सराफ यांचे अकाऊंट क्रिएट झाल्यानंतर अशोक सराफ यांना त्यांच्या चाहत्यांनी लगेच फॉलो केले. गेली कित्येक वर्षे अशोक सराफ आपल्या अभिनायाच्या जोरावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. सध्या अशोक सराफ यांचे वय 77 वर्षे आहे. तरीही त्यांच्या अभिनयामध्ये तितकीच ऊर्जा पाहायला मिळते. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चौकटराजा’ अशा विविधांगी सिनेमांमध्ये त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या. अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे.
कोणाकोणाला केले फॉलो
अवघ्या दोन दिवसांत अशोक सराफ यांना 10 हजारांहून अधिक लोकांनी फॉलो केले आहे, तर अशोक सराफ यांनी एकूण 38 लोकांना फॉलो केले आहे. सध्या एकूण 14 पोस्ट केल्या असून त्यांनी फॉलो केलेल्यांमध्ये पत्नी निवेदिता सराफ, वंदना गुप्ते यांचा समावेश आहे.